संग्रह ६०
माझ्या मामंजीची - स्नानसंध्या भारी
जवळ उभी मंदोदरी ।
सासू आत्याबाई - तुमच्या पदराला शेव
तुमच्या पोटचा - चुडा मव्हा महादेव ।
सासू आत्याबाई - तुमचा पदर जरीचा
तुमचा पोटचा - चुडा सावळ्या रंगाचा ।
सासू आत्याबाई - तुमच्या पदराला गाठी
सोडीले मायबाप - सावळ्या चुडयासाठी ।
कपाळाचं कुंखू - मह्या कपाळा दंडतं
फूल गुलाबाचं - कोण्या पेठला हिंडतं ।
बळदुं रे देवा - मला दुबळं राहू दे
कुंखू कपाळाचं - जोडा जल्माला जाऊ दे ।
कपाळाचं कुंखू - साता तोळ्याच्या मव्हरा
भाऊच्या ग तरी - तालुकदाराचा सोयरा ।
कपाळाचं कुंखू - कसं घामानं पांगलं
बोलले बापाजी - लेकी दैयव चांगलं ।
कपाळाचं कुंखू - लावते दोन बोटं
तुम्ही पाव्हं सय्याबाई - चुडा मव्हा उजवट ।
कपाळाचं कुंखू - लावते डौलदार
जावो जलमाला - चुडयाचा कारभार ।
नगर पेठला - मव्हा माणिक हिंडतो
गुलाबी पटका - याच्या सुर्तीला दंडतो ।
किती सांगू बाई - चाल मह्या चतुराची
हाती मिरी धोतराची ।
माझ्या चुडियाचं - सुख सांगते माहेरी
पितळी पलंग - त्याला काचंची पायरी ।
सेताच्या बांधाला - कसा पवना मातला
बईल सईला - धनी पेरण्या गुंतला ।
जाते मी हाटाला - नजर लावते दुरुनी
चोळीचे घेणार - उभे पालाला धरुनी ।
काळी चंद्रकळा - नेसाया मन झालं
चुडया मह्या चंदनाला - घेणाराला सांगाल कोण ।
शिणार्या मह्या दादा - सोड दिंडाच्या मोरख्या
अजुनी येईना - माझा कापड पारख्या ।
मह्या मनाची हाऊस - सांगल चुडया चंदनाला
नव खणाची वसरी - सौती खोली रंधनाला ।
मह्या मनाची हाऊस - सांगल सेताच्या सेतात
कडे पाटल्या हातात - सोनं टाकावं नथात ।
माझ्या चुडीयाची - उजवी बाही सोनियाची
काय करायाची - संपत दुनियेची ।
दुरुनी वळखीते - तुमच्या पटक्याची बांधणी
गंध कपाळाचं - जणु सुखाची चांदणी ।
सासू ग सासरा - सुखाची चांदणी
मह्या कपाळाचं कुंखू - सूर्व्य डोलतो अंगणी ।
भरताराचं सुख - हसून सांगते गोतात
अंगावरल्या शेल्याची - केली सावली शेतात ।
माझ्या अंगणात - चिमण्या पाणी पेती
हिरव्या पातळाच्या - नणंदा तोंड धूती ।
कुंखाच्या परीस - मह्या मेणाचा लघटा
चुडयाच्या परीस - नणंदाबाईचा मुखटा ।
आऊख मांगते - कुंखाखालच्या मेणाला
देराला ग तरी - मह्या पहिलवानाला ।
वडीलपन्नाला - किती चालू मी गहीन
देरा या बाम्हण्या - तुम्ही भाऊ मी बहीण ।
वडीलपन्नाचा - मोठेपणा मह्या शिरी
देर म्हणतो वह्यनी - जावा बाई बाई करी ।
धाकल्या देराला - काम सांगते चोरुन
वसरीला तांब्या - घ्यावा दादाजी भरुन ।
कवतूक पाहू - आपण घरच्या घरात
देर हे बाम्हण - उभे खोलीच्या दारात ।
सेताच्या बांधाला -जावा जावांची तगार
देर बाम्हणाचा - मंधी हौशाचा नांगर ।
धाकली मही जाऊ - कामाचा करते हेवा
देरा या सदाशिवा - पाण्याला गडी ठेवा ।
धाकल्या जावेला - काम सांगी रागंरागं
बारा बयलाचं शेण - दावण झाडू लाग ।
धाकली मही जाऊ - बोलते चिडी चिडी
इच्यावरी कायमुना - देर मोतीयाची लडी ।
धाकली मही जाऊ - बोलते चणाचणा
इच्यावरी का यमुना - देर मोतीयाचा दाणा ।
धाकल्या जावेचे - जाते कवतूक पाह्याला
भरताराला जेऊं घालून - आपण बसली न्हायाला ।
भांडती बांधव - जेवती एका ताटी
सांगते जाऊ तुला - अबोला कशासाठी ।
सुनेला सासरवास - जिनं आला तिनं केला
राणी बयाबाई - जलम भोळ्यामंधी गेला ।
सासरवासीनं - मह्या बाईनं पाहिली
हाती लाल तांब्या - तोंड धुवाया लागली ।
सासूचा सासरवास - नंदाबाईच्या काचण्या
रंगीला दादा मव्हा - घेतो शिवेहून बातम्या ।
सासूचा सासरवास - बंधू ऐकतो दारुन
कवळी याची शीण - नेत्र आलेत भरुन ।
सासूचा सासरवास - नंदाबाई हळू बोला
तुमच्या पाठीचा - बंधू बाहेरून आला ।
सुनंदला सासरवास - नका करु सासूबाई
तुमच्या पोटच्या - चण्यासाठी आली जाई ।
दुरुन वळखीते - मह्या चुडयाचं पाऊल
भाऊच्या मह्यासंगं - सालीयाचा डौल ।
दुरुन वळखीते - साल्या मेव्हण्याची चाल
भाऊचा पटका लाल - चुडयाची हिरवी शाल ।