संग्रह ५६
उठुन दिसती - मह्या माहेरचे लिंब
लिंबाला साखळदंड - माडीला हिरवा रंग ।
उठुन दिसती - मह्या माहेरचे पत्तर
रुपये लागले सत्तर - खिडक्या वाळती धोतर ।
उठुन दिसती - मह्या माहेरच्या भिंती
तांब्याच्या पराती - बंधू माहे पाय धूती ।
दुरुन दिसती - दिवे ये ग देवळाचे
भाई राजस ग माझे - कळस माझ्या माहेराचे ।
ये ग लोहगात - तिन्ही झाडांनी झाकलं
भाई राजसानं तसं - बाई माहेर झाकलं ।
बोलतील सय्या - तुला माहेरचं येड
पाठीचे दवलत - मव्हा ऊस भारी गोड ।
बय्या बय्या म्हणू - बय्या मही साकर सोजी
माहेरी जायाला - मन मव्हं झालं राजी ।
बाई माहेराला आले - मला ईसावा नसावा
भाई राजस ग माझा - सखा भाग्याचा असावा ।
हे ग दळण दळीते - माझ्या मुठीमंधी बळ
माय हरणीनं देलं - घुटीमंधी जायफळ ।
सजी जेऊ घाली - भरना माझं पोट
माते तुझी पाची बोटं - हयती माह्या हुरदात ।
सेजी जेऊ घाली - अर्थ करुनी नवला
माता घाली जेऊ - कळू देईना कोणाला ।
सेजी घाली जेऊ - करी आवड निवड
माता घाली जेऊ - पाचा पोळ्यांची चवड ।
मायबाईच्या ग मह्या - फार गोठी गुळावाणी
मावळाया गेला - शाळू दिवस वार्यावाणी ।
रामासारखे ग ल्योक - सीतेसारख्या ग सुना
आता महया बापाजीला - राजा दशरथ म्हणा ।
इंगोलीच्या मोंढयामंधी - गाडीला गाडी भिडे
वडील देसायाचा - जरीचा शेला उडे ।
इंगोलीच्या मोंढयामंधी - गाडया चालल्या दमानं
वडील देसायाला - अडत्या घालीतो सलाम ।
माता घाली न्हाऊ - येसीला गेला लोट
बापाजी चंदनानं - माळ्यानं धरली मोट ।
महया बंधवाचं - सेत काजळाची वडी
बारा बैल चौदा गडी - पिता चाले मागं पुढी ।
खांद्यावरी पोतं - वाणी हिंडतो कहीचा
आई या बापाचा - सौदा मिळना दोहींचा ।
शिण्याच्या साताला - चुलते दोघं तिघं
बोलले बापाजी - लुगडं न्हाई मनाजोगं ।
शिण्याच्या साताला - चुलत्या दोघी तिघी
बोलली मायबाई - चोळी न्हाई मनाजोगी ।
माईला म्हणते माय - चुलतीला म्हणते ताई
जरीचा पदर डोई - पित्या तुमची भावजई ।
माईला म्हणते माय - चुलतीला म्हणते गंगा
चुलत्या पांडुरंगा - खाली बसून गोठी सांगा ।
पाव्हाणे आले बाई - बाप पाटलाचे भाऊ
साळीचे तांदुळ - कोण्या उतळणीला पाहूं ।
घोडयाहून रामराम - कोण पाव्हणा आला बाई
भासा राघोबा बोलला - मुजरा घ्यावा आत्याबाई ।