संग्रह ३८
माळ्याच्या मळ्यामंदी काय गुलाबा तुझी सत्ता
वास घेणारा यील आता ।
भरील्या बाजारात खडी चोळीचं नाव गाव
बंधुजी बोलल्यात खडा टाकूनी मला दाव ।
लेन्या लुगडयाची नार दिसती देखनी
पोटी बाळाची घोरवनी ।
भावज गुजरी तुझ्या वाडयाला चौथी फेरी
बया माझी ती गवळण अंतःकरणाची नव्हती घरी ।
मोठ नि मोठ डोळ वरल्या देवाची करणी
माझ्या बंदूला देखूनी नार लागली झुरनी ।
येवडा माजा जीव गोड खायला सोकला
पीता माझा दवलत अंजीर बागत पिकला ।
भाचीच्या लगनात माजा हक्काचा मावळचीर
बंदुनी करनी केली दोनी पदरांना जर ।
शेवग्याच्या शेंगा आंतराळी लोंबत्यात्या
उंचया चोळ्या माज्या दंडाला शोभत्यात्या ।
भरिला बाजार बाई ग भरुनी वसरला
आताच्या राज्यामंदी भाऊ बहिणीला विसरला ।
गुज ना बोलायाला मला कशाला व्हवी लोक
बाळ माझी गीताबाई गुजाजोगीया माझी लेक ।
बारीक बांगडी बारा आण्याला लेती जोडी
हावशा बंदू माजा हासत चंची सोडी ।
गावाला गेला म्हणू एक महिना तीन वार
सुरत बंदुची गुलझार कुठं गुमला चंद्रहार ।
गावाला गेला म्हणू जीव माझा ग तगाद्यात
हावशा बंदुजीची गाडी खंडयान बोगद्यात ।
गावाला गेला म्हणू जीव लागला वाटेकडं
हावशा बंदुजीची गाडी खंडयाला घाट चडं ।
बेंदरापासुनी ग पंचीम उरली वीस रोज
बंधु माझ्या ताईताची वाट पातीया नितरोज ।
गावाला गेला बंधु त्याला मागली नाही सूद
नासून येवढं गेलं त्येच्या रतीबाचं दूध ।
गावाला गेला म्हणू मला वाटतं भना भना
चुडया माज्या हावशाचा बैठकीच्या जागा सूना ।
लाल पिंजबीरीचं कुंकू नको आत्तारा लावू जूकी
आम्ही लीयाचू माय लेकी ।
चहुबीसोपी वाडा टोलेजंग आदी मदी
मामा माझ्या गुजर्याला टाका पलंगावरी गादी ।
सरीलं ग दळायानं मला आणिक घेणं झालं
भाच्या माझ्या यशवंतानं बाप लेकानं येनं केलं ।