संग्रह ३५
भावज गुजरीचं तिचं बोलणं अहंकाराचं
चतुर बंधुजीचं गोड बोलणं शंकराचं ।
पंचविसाची नोट माझ्या तबकी टाकीली
भावज गुजरी ती ग रागानं उठली ।
धाकटया दिरांची मर्जी राखूं मी कोठवरी
दीर माझे की चंदन उभे दाटून वाटेवरी ।
धाकटे माझे दीर सासूबाईंचं शेंडफळ
माझ्या चुडयाचं पाठबळ ।
काळ्या ग घोंगडीला तिला रवड चवधारी
दीर माझ्या की चंदनाला नाव सोबतं कारभारी ।
तिघं माझं दीर दैवावाचून कुठले
सासू माझ्या ग मालनीला चाफे जाईला फुटले ।
हौस मला मोठी दिरा भावात नांदायाची
माडी कौलारी बांधायाची ।
चंदन मैलगिरी नाव माझ्या बापाईचं
बया माझ्या माऊलीचं गोड दुध नारळीचं ।
भूक लागली पोटाला भूक बाई दम धर
पाण्याच्या वाटेवर माझ्या माऊलीचं घर ।
पाऊस पाणी नाही गंगा कोणीकडूनी आली
माझ्या ग माऊलीची अवचीत भेट झाली ।
भरतार नव्हे बाई ती ग आंब्याची सावली
नाही आठवू दिली परदेशाला माऊली ।
देवाला मागते पाच पुत्रांची पंगत
जन्माला जावी माझ्या चुडया हौशाची संगत ।
अहेव मेली नार कंतानं झाडली घोंगडी
बोलतो भाऊराया बाळं पडली उघडी ।
देवानं दिलं आगल्या नांगल्या दोघ ल्याक
तान्ही तू मैना माझी न्याहारी न्यायला रंभा लेक ।
अंगणी ग माझ्या आला मोगरा बहरा
सुकल्या फूलमाळा सई येईना माहेरा ।
भरल्या बाजारात चोळ्या फुलांच्या वलनी
सयाला किती सांगू बया घेतीया मालनी ।
बंधु यीवाई करु गेली दीर दाजीबा बोलेनात
सोयरे आम्हांला तोलेनात ।
बंधुजी पाहुणा शेजी सांगत आली पुढं
चतुर माझा बंधु सरजा हासत जोतं चढं ।
बंधुजी पाहुणा शेजी पुसती खचोटीनं
आधी येऊ द्या बंधवाला मंग सांगेन निचिंतीनं ।
बंधुजी पाहुणा मी ग ओळखीला माळावरी
सोन्याची छतरी बाई माझीया बाळावरी ।