संग्रह ५३
१.
पिरतीचा भाव कान्त टाकीतो चूळ
सई माझ्या हारनीचं माझं भिजलं निर्या घोळ ।
पिरतीचा भाव कांतानं दिलं पान
सई माझ्या हरणीचं हिरवं रंगलं दात छान ।
२.
हिरवी काकनं हातात लेले व्हते
बाई माझ्या माहेरला रामेसराला गेले व्हते ।
माझ्या माहेराचं कसं नांदनं सोईचं
आई मारोतीचं व्हतं दरसन दोईचं ।
माहेरा ग घरी राज्य केलं मोंगलाई
मायबाईला माझ्या भरला तांब्या दिला नाही ।
माईचं माहेर भावाची धर्मपुरी
सांगते वहिनीबाई आशाची लंका दूरी ।
देवबाप्पा नको देऊं तू धनदौलत
घ्यावं माहेर खेळाया मायबापांच्या सावलीत ।
३.
नवतीची नारी तुझी नवती आवर
तुझ्या बोलन्यानं पडला सख्याला बावर ।
घरातली अस्तुरी तलवारीचं पान
पररानीसाठी नको घेऊ आडरान ।
घरातली अस्तुरी बुगडीच बोंड
परनारीसाठी का सुकली तुमची तोंड ।
परपंचाचा गाडा लोटता लोटना
हात लावा नारायना हरी सावळ्या मोहना ।
माझ्या रे परपंचाचा घोर म्यां नाही केला
हवाला केला तुला सावळ्या पांडूरंगा ।
गाईवरी गोदया लादील्या ग लमानानं
सवतीवरी लेक कोनी दिली बेईमानानं ।
माझ्या मी ग घरी नको करु माझा घोर
मायबाई माझे मला वाटतं माहेर ।
सुख सांगताना दुःखाचा आला लोंडा
बहीन माझी बाई हात लाविती माझ्या तोंड ।
४.
भाई राजापरीस भावज मालन चांगली
राया देसायाला घडी रंगाची लागली ।
माझ्या बंदू परीस माझी मालन देखनी
अशी वसरीला उभी जसी दऊत लेखनी ।
आईक भाऊराया नको म्हनू बहिनी फार
जसा चिमनीचा हार भुर्र उडून जाईल ।
मांडवाच्या दारी आयाराची सोळा ताटं
जाऊ मालनबाई माझ्या मानाची आधी ऊठ ।
अंतरीचं गुज सांगते माझ्या सख्या
नेनत्या माझ्या बंदू चल झाडाखाली एक्या ।
थोरल्या वाडयात कशी जाऊ मी एकांती
भाऊ भाच्याच्या माझ्या बाप लेकाच्या पंगती ।
माझ्या बहिनीचा बाळ मला म्हनीतो मावशी
देवदास हरी माझा फूल जाईचं सुवासी ।
थोरल्या घरची सून हांडया भांडयात राबती
बहिन माझे बाई तळखडया रंग देती ।
गावाला गेला बाई माझ्या गळ्यातली सरी
माझ्या राजबंधवानं कशी कटीली मुसाफरी ।