संग्रह ७२
जोंधळ्याचा गाडा आला माळाने गुंगत
काय बघता बायांनो माझ्या बंधूची हिंमत ।
चले सये जाऊ पिंपळाला पार बांधू
माझ्या बंधुजीला हावशाला पुत्र मागू ।
धावूनि धरिते तुझ्या पडावाचा दोर
माझ्या बंधुराया तांडेला मशी बोल ।
आशा नाही केली शेजीच्या बंधवाची
आवचित आली स्वारी बंधू माझ्या यादवाची ।
काय सांगू सये माझ्या बंधुचं नटणं
अंगी दोरव्याची बंडीवर चांदीची बटणं ।
शिंप्या सौदागरा सोड दिंडाच्या तू गाठी
बंधू भेटे बाजारात धरीते मनगटी ।
शिंप्या सौदागरा सोड दिंडाची सयली
माझा बंधूराया बग बाजारी बोहिली ।
बंधूला झाला पुत्र आली साखर माझ्या गावा
आगाशी दिवा लावा रामचंद्र नाव ठेवा ।
बहिण भावंडाची जोडी बसली वावरी
राघू मारितो भरारी मैना झालीया बावरी ।
बारीक माझा गळा वार्यानं ऐकू गेला
माझ्या बंधूनं घोडा मैदानी उभा केला ।
वाटच्या वाटसरा बस खाली देते पाणी
सावळं तुझं रुप माझ्या ताईत बंधूवानी ।
सुख सांगताना दुःख ठेविलं झाकुनी
आनंदलं मन माझ्या बंधूला देखुनी ।
बहिण भावडांचा कशाला राग रोस
जाई मोगर्यांचा दोहीचा एक वास ।
मामंजी सासूबाईचा वाटतो आदर
आता शोभिवंत त्यानं माझं घर ।
मांमजी सासूबाई दोन्ही सोनियाच्या भिंती
माझ्या ग आयुष्याचा वर गिलावा करु किती ।
मांमजी सासूबाई आहेत दैववान
शोभिवंत घर त्याचा मला अभिमान ।
मुलाबाळांनी भरलं बघा माझं बाई घर
मामंजी सासूबाई नशीब तुमचं आहे थोर ।
पुढल्या दरवाज्यांत नाही उभी मी रहाणार
आता मामंजीची मला आहे ग कदर ।
परक्या पुरुषाला कसा देऊ मी कातचूना
आम्ही गृहस्थाच्या सुना ।
सासरी जाताना डाळींबी दाटली
सखी जिवाची भेटली सईबाई ।
सासरी जाताना डोळ्यांना आलं पाणी
डोळे पुशी शेल्यांनी दादाराया ।
सासरीचे बोल जशा रेशमाच्या गाठी
सोशिल्या तुझ्यासाठी मायबाई ।
सावळ्या मेहूण्यांना नाही सुपारीची चाढ
दिलं लवंगेचं झाड सईबाई ।
सावळे मेहुणे आपल्या आईचे बाळक
दिली पूतळी ठळक सईबाई ।
पहाटेच्या प्रहरात हांडे घंगाळ वाजती
लेकी सूना वावरती घरामध्ये ।