तीन मुले 155
‘मधुरीला हवी आहे ना? तिला जर तसे वाटत असेल तर द्या तिला. ही घ्या.’
आणि त्याने ती काढून दिली. घोंगडी अंगावर घेऊन तो पडून राहिला. रात्री त्याने घोटभर दूध घेतले. तो आता शांत होता. म्हातारी पडून राहिली. दुस-या दिवशी मधुरी फळे घेऊन आली. पाहुणा पडून होता.
‘मधुरी, ही घे गोधडी.’
‘त्याने दिली?’
‘हो.’
मधुरीने ती गोधडी घेतली. तिने नीट पाहिली. होय. तीच गोधडी होती! तिने ती हृदयापाशी धरिली.
‘आजी, मंगाचीच ही गोधडी. माझ्या मंगाची शेवटची आठवण हिच्यात भरून त्याने पाठविली असेल. सारंग गावाच्या तीरावर लाटांबरोबर ही जाईल असे त्याला वाटले असेल. लाटांनो. न्या ही गोधडी. मधुरीच्या आठवणींनी भरलेली गोधडी. ती समुद्रावर दररोज येत असेल. माझी वार्ता विचारीत असेल. तिला ही गोधडी द्या. तिला सारे सांगेल. आजी, असे का मंगा बुडता बुडता म्हणाला असेल? लाटांशी झुंजता झुंजता म्हणाला असेल? आजी, मी जाते माझ्या मंगाची ही गोधडी. परंतु मंगा कोठे आहे? गोधडी मिळाली. मंगा नाही का मिळणार? मिळेल. पुढील जन्मी तरी मिळेल.’
‘मधुरी, मंगा परत आला तर? ही गोधडी आली, ती पांघरणाराही आला तर? तर तू आता बुधाची झाली आहेस; त्याला काय वाटेल?’
‘मी त्याची समजूत घालीन. भांडू नका म्हणून सांगेन. मी दोघांची आहे असे सांगून त्यांना गप्प करीन. हळूच थापट मारीन. दोघे माझे ऐकतील. लहानपणी ऐकत. मोठेपणी का ऐकणार नाहीत? आजी, मी जाते. ही गोधडी अंगावर घेऊन पडते.’
आणि मधुरी गेली. ती गोधडी घेऊन ती गेली. आपल्या मंचकावर ती गोधडी पांघरून निजली. आत गोधडी, वरून बुधाची शाल. ती भावनांनी उचंबळली होती.
‘हे काय मधुरी! झोपलीसशी!’ बुधाने येऊन विचारले.
‘आज झोपावेसे वाटत आहे. निजू दे मला.’ ती म्हणाली.
‘अंग का दुखते? चेपू?’
‘नको. अंग, उलटे सुखावले आहे बुधा. तू जा. मला झोपू दे.'
‘झोप. मधुरी, झोप. तुला नीटशी झोप कधी येतच नाही.’
‘आज येणार आहे पण किती तरी दिवसांत अशी झोप आली नसेल. आज येणार आहे. जा तू. मुलांना इकडे येऊ देऊ नकोस.’
‘नाही येऊ देत.’