तीन मुले 88
‘नाना देश, नाना लोक. तुझे भाग्य.’
‘मंगा, आपण अशी बसलो म्हणजे सारे भाग्य असते हो त्यात.’
‘मधुरी आपण थोडा वेळ पुन्हा लहान व्हायचे का? घसरगुंडी करायची का?’
‘हं. पण लोक हसतील हो.’
‘कुठे आहेत लोक! आणि कोणी पाहिले तर पाहिले. इतके लोकांना काय भ्यायचे! चल, धर माझा हात. एकदम धर्रकन् सर्रकन् खाली जाऊ.’
आणि दोघे खरेच घसरत खाली गेली. हसली. पुन्हा पळत वर आली.
‘पुरे मंगा.’
‘एवढयात दमलीस?’
‘मंगा, तीन बाळंतपण झाली माझी, मी का पूर्वीची आहे?’
‘बाळंतपण म्हणजे मरण. तीन मरणांतून वाचलीस. होय ना!’’
‘कठीण असते हो मंगा.’
‘आणि आता चौथे येईल तेव्हा मी नसेन.’
‘तू सहा महिन्यांत परत नाही येणार?’
‘काय नेम! वा-यावर सारे अवलंबून. आलो तर ठीक, नाही आलो तर! मधुरी, आता आपण समुद्राच्या व वा-याच्या स्वाधीन.’
‘मंगा, तू नको जाऊस, मला भीती वाटते.’
‘वेडी आहेस.’
‘मंगा, वाळूच्या टेकडयाही काय कामाच्या!’
‘वाळूच्या टेकडयाही काही निरुपयोगी नाहीत. या टेकडीवर आपण लहानपणापासून येत आहोत. ती टेकडी का नाहीशी झाली! मधुरी, मी सुखरूप परत येईन. तुझी गोधडी मला परत आणील. परंतु तुझ्या नव्या बाळंतपणाच्या वेळीच येईन असे नक्की थोडेच आहे! काय ठेवशील नव्या बाळाचं नाव! आपण ठरवून ठेवू.’
‘काय ठेवायचे सांग.’
‘वेणू नाव मला आवडते.’
‘बरे तर. ठेवीन, पण मुलगा झाला तर!’
‘त्याचे नाव मोत्या ठेव. मी मोती आणायला जात आहे. तुझ्या पोटी मोती देऊन, तुझ्या ओटीत मोती घालून जात आहे, मोती नाव ठरलं हं.’
‘बरे हो मंगा.’
‘आज बुधा नाही आपल्याबरोबर.’