तीन मुले 11
बुधा
बुधा श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा होता. आईबापांचा तो फार लाडका होता. त्याचे सारे हट्ट पुरविले जात, त्याचे सारे लाड केले जात. तो मागेल ते खेळणे त्याला मिळे. तो मागेल तो व मागेल तितका खाऊ त्यास मिळे. त्याला एक पंतोजी घरी शिकविण्यासाठी येत असत. बुधा आता मोठा झाला होता; परंतु कृश होता. त्याचे डोळे पाणीदार दिसत; त्याला पाहून मन शांत व प्रसन्न होत असे.
आपल्या मुलाचे लग्न करावे असे बापाच्या मनात आले. श्रीमंताच्या एकुलत्या एक मुलाला कोण मुलगी देणार नाही? अनेक मुली सांगून येऊ लागल्या. बाप निवड करु लागला. विचार करु लागला. एके दिवशी बुधाचे आईबाप त्याच्या लग्नाविषयी बोलत होते.
‘माझे इतक्यात लग्न नको, असे बुधा म्हणतो. बाप म्हणाला.
‘त्याच काय ऐकता? मुलांचे का ऐकायचे असते?’ आई म्हणाली.
‘अग, तो लग्नाला उभा तरी राहिला पाहिजे ना? कोठे पळून गेला तर? डोक्यात राख घालून गेला तर?’ तो म्हणाला.
‘काही नाही पळून जात. बुधा भित्रा आहे सा-या मुलखाचा थोडी रात्र झाली तर तो बाहेर जायला भितो. समुद्राच्या पाण्यात जायला भितो. तो कोठे जाणार पळून?’ ती म्हणाली.
‘अग, एखादे वेळेस भित्री मुलेच शूर होतात. वाटेल ते ती करु शकतात. बुधा हट्टी आहे. मनात आणील ते तो करील. म्हणून त्याच्या तंत्राने घ्यावे. त्यालाही विचारावे. काही दिवस जाऊ द्यावे.
‘आपले लग्न झाले तेव्हा आपण केवढी होतो?’ ती म्हणाली.
‘मला ते आठवत नाही.’ तो म्हणाला.
‘मलाही आठवत नाही. ती म्हणाली.
‘परंतु बुधा ऐकत नाही. आपलेच चुकले. आपण त्याला लग्नाशिवाय इतका मोठा होऊन दिला हेच चुकले. कळत नसते तेव्हाच मुलांची लग्ने केलेली बरी. त्यांचा हात धरुन बसविता येते. मनासारखे सारे करता येते. तो म्हणाला.
‘मी तुम्हाला सांगत होते, परंतु तुम्ही एकेले नाही.’ ती म्हणाली.
‘तू त्याची समजूत घाल. त्याला तयार कर. तुझे तो ऐकेल.’
‘सांगेन. माझे तो ऐकेल.’ ती म्हणाली.