तीन मुले 18
मधुरीचा बाप बाहेर आला. बुधाचा बाप वाटच बघत होता.
‘काय म्हणते मधुरी?
‘नाही म्हणते.’
‘बुधा तिला आवडत नाही?’
‘आवडतो, परंतु नवरा म्हणून नाही आवडणार असे ती म्हणते.’
‘तिची समजूत घाला.’
‘नकोच. श्रीमंताकडे नकोच संबंध.’
‘बुधा माझा एकुलता एक मुलगा. माझी कीव करा. मुलाची निराशा माझ्याने बघवणार नाही.
‘परंतु मधुरी तयार नाही. नकोच.’
‘बरे तर, मी जातो.’
बुधाचा बाप घरी आला. पत्नीजवळ सारी हकीकत त्याने सांगितली. बुधालाही सारे कळले. बुधा खिन्न झाला. त्याचे हसणे संपले. तो आता खोलीच्या बाहेर पडेनासा झाला. खोलीतून दिसणा-या अनंत समुद्राकडे तो बघे व त्याचे डोळे भरत. तो मनाला शांत करण्यासाठी हातात कुंचला घेई. परंतु बोटे थरथरत. डोळे भरत. आजपर्यंत त्याला आशा होती. परंतु आता संपूर्ण निराशा झाली. कुंचला फिरेना. दृष्टी ठरेना. तो चित्रे काढीनासा झाला. त्याची कला मेली. तो विकल झाला. बुधाचे दु:ख पाहून आई-बापही दु:खी होत. एके दिवशी पिता बुधाच्या खोलीत येऊन म्हणाला.
‘बुधा, माझे ऐक.’
‘बाबा, इतर सारे ऐकेन. आता लग्नाची गोष्टच नको.’
‘बाळ, तुझ्यासाठी मी मधुरीकडे गेलो. सारा अहंकार बाजूस ठेवून गेलो. तू नाही का रे पित्यासाठी अहंकार सोडणार? दुसरी मुलगी कर. सुखी हो. आम्हाला सुखी कर. तुझे दु:ख पाहून आमच्या जिवाचे पाणी होते. ती रडत. माझेही डोळे भरुन येतात.’
‘बाबा, मी काय करु? लग्न अशक्य आहे. तुमच्यासाठी माझी निराशा विसरुन मी हसावे, खेळावे असे मला वाटते. परंतु मला ते जमत नाही. बुधाला असे जगणे जगता येत नाही. आत एक बाहेर एक मला साधत नाही.’
असे काही दिवस चालले. शेवटी बुधाच्या आईबापांनी अंथरुण धरले. बुधा त्याची सेवाशुश्रूषा करीत होता. परंतु आईबाप वाचले नाहीत. बुधाच्या दु:खाने ते मेले. बुधाच्या निराशेने त्यांचे प्राण नेले. बुधा एकटा राहिला. आईबापांच्या आठवणी करीत तो एकटा त्या घरात भुतासारखा बसे. गरीब विचारा दुर्दैवी बुधा !