तीन मुले 62
‘मंगा, कशी तुझी समजूत घालू? माझ्या मनात सुखाच्या कल्पना नाही हो कधी येत. पलंग, गाद्या, गिद्र्या स्वप्नातही मी मनात आणीत नाही. तुझे गोड बोलणे, गोड हसणे यात माझी सारी सुखे आहेत. तू कामावरुन येतोस व डोळे भरुन मला पाहतोस. त्यानेच मला सारे काही मिळते. मी दिवसभर तुझी वाट पहात असते. केव्हा दृष्टीस पडशील असे मला वाटते. माझा मंगा, बंदरावर काम करीत असेल, बोजे वहात असेल, त्याची पाठ वाकत असेल, घाम गळत असेल, मी जवळ असते तर तुझा घाम पुसला असता. मंगा कधी कधी आपणही बंदरावर कामाला जावे असे माझ्या मनात येते. आपण बरोबर काम केले असते. मुले आजीबाईकडे खेळली असती. परंतु बायका बंदरावर कामे करीत नाहीत. तुझी मूर्ती सारखी माझ्या डोळयांसमोर असते. नको हो जाऊ तू कोठे. भाजीभाकरी तीच असते. परंतु तू रोज नवा आहेस. तुझा जोपर्यंत मला कंटाळा आला नाही तोपर्यंत भाजीभाकरीचाही येणार नाही. तुझी गोडी जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत बेचव असे काही नाही, नीरस असे काही नाही. ज्या दिवशी तू मला फिका वाटशील, त्या दिवशी मला जिणेच फिके वाटेल. मग ही मधुरी जगू शकणार नाही. आम्ही बायका प्रेमावर जगतो. आम्ही अल्पसंतोषी असतो. एक गोड शब्द मिळाला, एक गोड हास्य मिळाले, एक गोड हळूच चापट मिळाली तर आम्ही मोक्षसुख मानतो. हसतोस काय मंगा? हे काय, अशी जोराने नको थप्पड मारुस. मनी उठली वाटते. झोपाळयावर बाहेरच निजली आहे. पडायची एखादे वेळेस. मी घेऊन येते.’
असे म्हणून मधुरी उठून गेली. सोन्या, रुपल्या झोपले होते. मधुरी मनीला घेऊन आत आली. तिला प्यायला घेऊन ती बसली.
‘मधुरी. मी बाहेर जाऊन येतो.’
‘लौकर ये मंगा. उगीच एकटा समुद्रकाठी नको जाऊस. माझी शपथ आहे. माझ्या बाळाची शपथ आहे.’
‘लौकर परत येईन.’
मंगा बाहेर पडला. परंतु तो कोठे जाणार होता? त्याचे निश्चित ठरलेले असे काहीच नव्हते. तो चालला. कोठे तरी. परंतु शेवटी समुद्राकडेच निघाला. मधुरीने जाऊ नको असे सांगितले होते, तरी पाय तिकडेच वळले. तो त्या टेकडीवर आला. अनेक आठवणी त्याच्या डोळयांसमोर होत्या. ते रम्य बालपण त्याला आठवले. बालपणी ते वाळूमध्ये खेळणे मौजेचे वाटे. वाळूचे किल्ले, वाळूचे बंगले. त्यात त्या वेळेस मन रमे. परंतु आज मन नीरस झाले होते. पुन्हा एकदा लहान व्हावे असे त्याला वाटले. तो घसरगुंडी करीत खाली आला. पुन्हा टेकडीवर चढला.
इतक्यात कोण दिसले त्याला? कोणी तरी त्याला दिसले. कसली तरी आकृती दिसली. ती त्याच्याकडे बोटे करीत होती. डोळे वटारुन पहात होती. कोणाची ती आकृती? पांढरी सफेद आकृती. भूत की काय? मनुष्य की पिशाच्च? मंगा पहात होता. इतक्यात पाठीमागून कोणी तरी आले. मंगाने मागे पाहिले. तोही का भूत? पुढे भूत नव्हते, तो बुधा होता.