तीन मुले 87
मंगाने मनी मधुरीजवळ दिली. खरोखरच रुपल्याला उचलून घेतले.
पुन्हा रुपल्या कधी भेटणार होता? मंगाचे मन गहिवरून आले होते. तो रुपल्यास थोपटीत होता. रुपल्याने खांद्यावर प्रेमाने मान ठेवली होती. बापलेक सुखावले होते.
‘ठेव त्याला खाली. हात दुखेल हो मंगा.’ मधुरी म्हणाली.
‘हात नाही दुखत.’ मंगा म्हणाला.
‘बाबा, उतरवा आता मला; पुरे.’ रुपल्या म्हणाला.
रुपल्या उतरला. सारी घराजवळ आली. मधुरी घरात गेली. मंगा बाहेरच झोपाळयावर होता. सोन्या, रुपल्या त्याच्याजवळ होते.
‘बाबा, मी आता मोठा झालो, नाही!’
‘हो तू आईला मदत करीत जा. भांडू नको. भावंडांना खेळव.’
‘बाबा तुम्ही मला उचला ना. मला लहान समजून घ्या ना.’
आणि मंगाला ते शब्द विरघळविते झाले. तो उठला. त्याने सोन्याला उचलले. सोन्या जड होता. त्याने सोन्याला हिंडविले. इतक्यात मधुरी बाहेर आली.
‘हे रे काय सोन्या! तू का लहान आता! कोणी पाहिले तर काय म्हणेल?’ उतर वेडा कुठला.
सोन्या उतरला. तो झोपाळयावर वडिलांजवळ बसला. मंगा सोन्याच्या पाठीवरून हात फिरवीत होता. जसजसा जाण्याचा दिवस येत होता तसतसे प्रेम वाढत होते. बोलणे, चालणे, पाहणे सारे प्रेममय होत होते. हळुवार, गोड सुकुमार होत होते, आंबट आंबा पिकत होता. सारे रसमय होत होते.
आज मधुरीने जेवायला गोड केले होते.
‘आज का सण आहे मधुरी! उद्या सकाळी मी जाणार. तुला तर वाईट वाटत आहे. मग हे गोड कशाला? दिवाळी थोडीच आहे? मंगा, तू पुन्हा केव्हा येशील? जाताना तुझे तोंड गोड करू दे. आता निरनिराळे सण येतील. परंतु तू नसशील. परदेशात असशील. ना तेथे कोणी ओळखीचे, ना कोणी नात्याचे. आम्हाला आठवणी येतील. तुला कोण तेथे देईल गोडधोड! म्हणून हे आज देऊन ठवते. त्या परदेशात येणा-या सणासाठी हो ही आजची माझी मेजवानी. हे गोड तेथे आठव. मधुरीच्या हातचे पक्वान्न आठव.’
सारी त्या टेकडीवर गेली. मुले पाण्यात खेळत होती आणि मंगा व मधुरी टेकडीवर खेळत होती. दोघे जवळ जवळ बसली होती. हातात हात घेऊन बसली होती.
‘मंगा, काय दिसत आहे समोर?’
‘समुद्र.’
‘आणि त्याच्या पलीकडे!’