तीन मुले 89
‘त्याला कळले असेल का?’
सा-या गावाला कळले आहे. त्याच्याही कानावर गेली असेल वार्ता.’
‘मंगा, त्याचा निरोप घेऊन येशील?’
‘नको. मला धैर्य नाही होत. त्याच्या घराभोवती भूत आहे. मधुरी, येथेच मला त्या दिवशी दिसले. मला भीती वाटली.’
आणि मंगाच्या अंगावर काटा उभा राहिला. तो त्या आठवणीने घाबरला. मधुरीने त्याला धरून ठेविले. तो शांत झाला. आसपास पाहू लागला. मग हसला.
‘किती भित्रा मी मधुरी!’
‘भुतांची भीती वाईट हो. तू मनातून ते काढून टाक.’
‘चल आपण खाली जाऊ. मुलांमध्ये मिसळू.’
दोघे खाली आली. मुले समुद्रकाठच्या जंमती जमवीत होती.
‘पुन्हा बांधू किल्ला मधुरी!’
‘मी राणी.’
‘आम्ही तुझे नोकर.’
‘लहानपणी सारी मजा असते.’
आणि खरेच मंगा किल्ला बांधू लागला. मुलेही आली मदतीला. काय जोरात सुरु झाले आणि किल्ला तयार झाला. मुलांनी टाळी वाजविली आणि रुपल्याने एकदम हातांतली शिंपली त्याच्यावर फेकली. ढासळला किल्ला.
‘लहानशा शिंपलीने ढासळला किल्ला.’ मंगा म्हणाला.
‘चला, आता घरी जाऊ.’ मधुरी म्हणाली.
‘एवढयात नको आई.’ सोन्या म्हणाला.
‘अरे भूक लागली; जाऊ.’ रुपल्या म्हणाला.
‘अरे, त्या मनीला आण. ती बघ तिकडे डोक्यात वाळू घालीत आहे. जा सोन्या.’
‘सोन्याने तिला आणिले.’ आईने तिचे डोके झाडले.
‘डोक्यात का वाळू घालायची?’ असे मधुरीने रागाने म्हटले. मनी रडू लागली.