तीन मुले 146
‘मंगाला मी लहानपणापासून ओळखते. ती तीन मुले होती. मधुरी, मंगा व बुधा. येथे समुद्रावर खेळायची, भांडायची, माझ्याकडे यायची. खाऊ खायची. छान होती मुले. हसणारी खेळणारी मुले मोठी झाली. मधुरीवर बुधा व मंगा दोघांचे प्रेम होते. तिला दोघेही आवडत; परंतु मंगा तिला अधिक आवडे. तिने मंगाजवळ लग्न केले. बुधा तसाच अविवाहित राहिला.’
‘तो का गरीब होता?’
‘नाही. बुधा श्रीमंत होता; परंतु त्याने लग्न केले नाही. तसाच एकटा राहिला.’
‘अजून तसाच आहे का?’
‘थांबा, सारे सांगते. मंगाला नेहमी प्रवासास जावे असे वाटे. मधुरी नको म्हणे. तो रागावे, संतापे. शेवटी गेला तो एका गलबतात बसून. मधुरी गलबत येण्याची सारखी वाट पाही. ती त्या वेळेस गर्भार होती. त्या दु:खात तिचे बाळ जन्मले ते मेलेले.’
‘अरेरे ! गरीब बिचारी!’
‘तिला ते अशुभ वाटले. नवरा सुखरूप येतो की नाही याची तिला चिंता वाटे. बरेच दिवस गेले आणि एके दिवशी बातमी आली की, ते गलबत वादळात बुडाले. आमच्या गावचे बरेच लोक त्यात होते. सा-या गावात हाहाकार उडाला. मधुरी जवळजवळ दु:खाने वेडी झाली. परंतु मुलांसाठी ती जगली.’
‘कोठे आहे ती?’
‘सांगते सारे. आणि मंगाचे गलबत बुडालेले कळल्यावर थोडया दिवसांनी बुधा तिच्याकडे गेला. तो तिचे सांत्वन करू लागला. तिला मदत देऊ लागला. तिला नाकारवेना. असे काही दिवस गेले आणि एके दिवशी बुधाने तिला लग्न कर असे सांगितले.’
‘लागले का लग्न?’
‘हो. गंमत अशी की, लहानपणी मधुरी दोघा मित्रांना म्हणे की, मी तुमची दोघांची छोटी बायको होईन. ते शब्द बुधा विसरला नव्हता. तो म्हणे, देवाची अशीच इच्छा असेल की ते शब्द खरे व्हावे.’
‘आणि मधुरीने का आनंदाने त्याच्याजवळ लग्न लावले?’
‘ती तयार नव्हती. तिला काय करावे कळेना. बुधा म्हणे, मंगा होता तोपर्यंत मी कधी असे विचारले का? आता विचारतो. माझ्या जीवनात दे आज थोडा आनंद. मधुरी एके दिवशी माझ्याकडे आली व म्हणाली,
‘आजी, मला वाट दाखव. काय करू?’
‘काय सांगितले तुम्ही?’
‘सांगितले की काही हरकत नाही. कर बुधाजवळ लग्न. मुलांची सोय होईल. बुधाही जरा हसेल. बिचारा बारा वर्षं बैराग्यासारखा राहिला. असे प्रेम दुर्मिळ हो.’
‘आणि ती दोघे आता एकत्र राहतात वाटते?’
‘हो, बुधाच्या मोठया घरात सारी रहावयास गेली. ती पूर्वीची झोपडी गेली. तेथे आता काही नाही. बुधाने ती जागा कोणाला तरी विकली असे वाटते.’