तीन मुले 12
एके दिवशी बुधा आपल्या खोलीत बसला होता. त्याची खोली मोठी सुंदर होती. खोलीतून दूरचा समुद्र दिसत असे. खोलीत वारा खेळत असे. खोलीत सुंदर चित्रे होती. बुधाही चित्रकला शिकला होता. त्याचा चित्रांचा नाद लागला होता. आजही तो एक चित्र काढीत होता. कशाचे चित्र? सूर्योदयाचे काय सूर्यास्ताचे? फुलांचे का मुलांचे? समुद्राचे का नारळीच्या बनाचे? मनुष्याचे का मनुष्येतर सृष्टीचे? ते चित्र एका मुलीचे होते.
बुधा चित्रात रमला होता. हातात रंगाचे कलम होते. त्या चित्राकडे तो पहात होता. इतक्यात खोलीत आई येऊन उभी राहिली. बुधाला कळलेही नाही.
‘बुधा, तुझ्याकडे मी आले आहे.’ आई शेवटी म्हणाली.
‘ये आई, बस.’ तो म्हणाला.
‘बुधा!’
‘काय आई?’
‘तू मला फार आवडतोस. किती गोरा गोमटा दिसतोस!’
‘आई, मी तुला आवडतो. परंतु सर्वांना आवडेन असे नाही.’
‘कोणाला आवडणार नाहीस? तू सर्वांना आवडशील! गुलाबाचे फूल कोणाला आवडत नाही? कमळाचे फूल कोणाला आवडत नाही? आकाशातील चंद्र कोणाला आवडत नाही? मोलाचे माणिक मोती कोणाला आवडत नाही? तू माझे माणिक मोती, तू माझे चंद्र, तू मला आवडतोस, सर्वांना आवडतोस.’
‘आई, हे चित्र तुला आवडते की नाही?’
‘कुणाचे रे हे?’
‘पण तुला आवडते की नाही?’
‘किती सुरेख काढले आहेस!’
‘आई, एका मुलीचे आहे ते चित्र!’
‘बुधां, मुलीच्या चित्रात रमतोस. प्रत्यक्ष खरोखरीची अशी एखादी सुंदर मुलगी जर मिळाली तर किती रमशील, किती हसशील, आनंदशील? स्वनापेक्षा प्रत्यक्ष अनुभवात अधिक मौज आहे.’