तीन मुले 104
‘आजी, हे कोण?’
‘ते पाहुणे आहेत. या गलबतातून आले.’
‘तुम्हांला आहे का हो माहिती!’
‘कोणाची बाळ?’
‘माझ्या वडिलांची’.
‘कोठे गेले तुझे वडील!’
‘किती तरी दिवस झाले. ते एका गलबतात बसून गेले. माल घेऊन गेले; परंतु आले नाहीत. तुम्हांला भेटले का ते कोठे?’
‘तुझ्या वडिलांचे नाव काय?’
‘मंगा.’
‘गलबताचे नाव काय?’
‘ते नाही मला माहीत.’
‘आमच्या गलबतावरच्या खलाशांना काही माहिती असेल. तू येतोस माझ्याबरोबर?’
‘हं. चला.’
दोघे निघाले. आता गर्दी कमी झाली होती. खलाशी स्वस्थ बसले होते.
‘का रे, तुम्हांला येथल्या एका गलबताची माहिती आहे?’
‘कोठले गलबत?
‘वर्ष होऊन गेले, येथून एक गलबत गेले, ते परत आले नाही.’
‘एक गलबत बरेच दिवसांपूर्वी वादळात सापडले व बुडाले असे म्हणतात. परंतु ते इथलेच की काय ते कळायला मार्ग नाही.’
इतक्यात आणखी एक मनुष्य आला. तो कोणी व्यापारी दिसत होता.
‘काय म्हणता?’ त्याने विचारले.
‘तुम्हाला आहे का हे माहीत?’ त्या पाहुण्याने विचारले.
‘त्या गलबताविषयी ना? मघा तीच तर बातमी सांगत होतो. येथेल ते गलबत बुडाले. सारे लोक बुडाले. मघा लोक त्यासाठीच जमले होते. फार भयंकर गोष्ट. या गावातील बरेच लोक त्यात होते.’
‘माझे बाबा कोठे आहेत?’
‘तुझे बाबा?’
‘हो.’
‘चल बाळ, मग सांगेन.’ तो पाहुणा म्हणाला.
सोन्या व तो पाहुणा म्हातारीकडे आले.