तीन मुले 50
‘मधुरी!’
‘काय राजा?’
‘उद्या आपली मुले मोठी झाली म्हणजे एकमेकांच्या तोंडात असा तुकडा येईल का देता?’
‘मग मुलांच्या तोंडात घास आपण देऊ. खरे ना?’
‘मधुरी, तुझे बोट चावू?’
‘ते का साखरेचे आहे?’
‘हो. तुझी बोटे म्हणजे ऊसाची पेरे. खाऊ का?’
‘वेडा आहेस हो मंगा. माझी बोटे गोड झाली असतील तर ती का, ते आहे का माहीत?’
‘का!’
‘तुझा हात हातात धरुन. तुझे डोळे झाकून. माझ्या हातात गोडी तू ओतली आहेस.’
‘दोघे फिरायला निघाली. हळू हळू जात होती. मंदमंद पावले टाकीत जात होती.’
‘मंगा, आजीबाईकडे येतोस का?’
‘चल.’
‘दोघे समुद्रावर आली. म्हातारी झोपडीच्या दारात रामराम म्हणत बसली होती. मधुरी एकदम गेली. तिने म्हातारीचे डोळे झाकले. मंगा दूर उभा होता. म्हातारी म्हणाली, सोड डोळे.’
‘आजी, तू कसे ओळखलेस! तिने विचारले.’
‘तुझीच आठवण करीत होते. खाऊ ठेवला होता तुम्हाला.’
‘कोठे आहे?’ मंगाने विचारले.
‘मधुरी आणील.’ आजी म्हणाली.
मधुरीने घरातून खाऊ आणला. केळी होती. खारका होत्या. मधुरीने मंगाना दोन केळी दिली. स्वत:ला तीन घेतली.
‘तुला एक जास्तसे?’
‘मी बरोबर वाटणी करते.’
‘ती कशी!’
‘आजी, दोन मला व एक माझ्या बाळाला. नाही का ग?’
‘होय हो मधुरी.’