तीन मुले 7
‘मला सारे कळते.’
‘आम्हांस शिकवीत जा.’ मधुरी म्हणाली.
‘मी कितीतरी पुस्तके वाचतो.’ बुधा म्हणाला.
‘मला नाही आवडत पुस्तके.’ मंगा म्हणाला.
‘तुझे माझ्याविरुध्द असावयाचेच.’ बुधा म्हणाला.
‘पुरे रे भांडण. आता खेळू.’ ती म्हणाली.
‘आम्ही दोघे पळतो. तू धर.’ मंगा म्हणाला.
‘पण एक वाटोळी रेघ काढ. तिच्या बाहेर जायचे नाही.’ ती म्हणाली.
मंगाने रेघ काढली. भरती येऊन केव्हाच गेली होती. वाळू घट्ट बसली होती. खेळायची मजा होती. मधुरी त्यांना धरु लागली. मंगा खूप पळे. बुधा पटकन् सापडला.
‘बुधा, तू मुद्दाम पळाला नाहीस. हा का खेळ?’ मधुरीला आज आपण दमवले असते. मंगा म्हणाला.
‘मला फार पळवत नाही, मी दमतो. मुद्दाम नाही काही मी सापडलो.’ बुधा म्हणाला.
‘बरे, आता मला धर.’ मंगा म्हणाला.
मंगाच्या पाठीस बुधा लागला. परंतु मंगा सापडेना. शेवटी बुधाने मधुरीला धरले. मंगा संतापला.
‘तुम्ही दोघे एकमेकांना धरता. मला कोणीच पकडीत नाही.’ तो म्हणाला.
‘तू आम्हांला सापडत नाहीस.’ बुधा म्हणाला.
‘आम्ही आता दोघे तुला पकडतो. दोघे तुला धरतो.’ मधुरी म्हणाली.
‘चल तर.’ मंगा म्हणाला.
पुन्हा खेळ सुरु झाला. मंगा त्या दोघांना चुकवीत होता. शेवटी सापडला. एकदम त्या दोघांनी धरले.
‘मेलास ना?’ मधुरीने विचारले.
‘तुम्ही दोघांनी मला मारलेत. नाहीतर मी मेलो नसतो.’ मंगा म्हणाला.
‘मला भूक लागली आहे.’ मधुरी म्हणाली.
‘मी आजीबाईकडून आणू का काही खायला?’ मंगाने विचारले.
‘आपण सारीच तिच्याकडे जाऊ.’ मधुरी म्हणाली.
‘मी नाही येणार. तेथे का खायचे?’ बुधाने विचारले.
‘आमच्याबरोबर नाही खाणार? चल.’ मधुरीने सांगितले.