तीन मुले 117
‘आणि चित्रे आणलीस?’
‘मी जेवल्यावर दाखवीन.’
पाटरांगोळया झाल्या. सारी जेवायला बसली. मुले जेवून गेली. बुधा पाटावरच होता. मधुरी जेवत होती. तिच्या डोळयांतून पाणी आले.
‘मधुरी!’
‘काय बुधा?’
‘नको हो रडू. आठवणी यायच्याच.’
‘बुधा, मंगा गेला त्या दिवशी आम्ही एका ताटात जेवलो. तो मला भरवी व मी त्याला. मंगा वेडा होता.’
‘मी देतो तुझ्या तोंडात घास.’
‘कोणी पाहील?’
‘पट्कन देतो.’
आणि बुधाने तिच्या तोंडात घास दिला आणि मधुरीने त्याचे बोट धरले.
‘चावू का तुझे बोट?’ तिने विचारिले.
‘ते का गोड आहे मधुरी?’ त्याने प्रश्न केला.
‘हो, गोड आहे. खाऊन टाकते.’ ती म्हणाली.
आणि तिने त्याचे बोट हळूच दातांनी चावले.
जेवणे झाली. निरवानिरव झाली. मुले ओसरीवर खेळत होती.
‘बुधा, दाखव चित्रे.’ मधुरी म्हणाली.
बुधाने चित्रसंग्रह सोडला. एकेक चित्र दाखवू लागला.
‘हे बघ मधुरी, यात तुझे डोळे मी झाकीत आहे असे आहे. माझे हे आवडते चित्र.’
‘मला आंधळे करायला तुला आवडते; माझे डोळे झाकून मला वाटेल तेथे नेऊ बघतोस; होय ना?’
‘परंतु तुलाही डोळे झाकलेले आवडतात हो.’
‘आणि आपण टेकडीवरून घसरत आहोत त्याचे हे चित्र.’
‘आणि हे रे बुधा?’
‘लहानपणी मी प्रथम भेटलो त्याचे. तुम्ही वाळूचे किल्ले करीत होतात. किल्ला पडे. मी जवळ उभा होतो. मी विचारले, ‘मी देऊ का करून?’ तो हा प्रसंग.