तीन मुले 40
‘बुधा चांगला आहे नाही? सौम्य व शांत.’
‘मधुरी!’
‘काय मंगा?’
‘तुला मी आवडतो की बुधा?’
‘मी या क्षणी तुझ्याजवळ आहे यावरुन तुला नाही काही समजत?’
‘परंतु माझ्या मांडीवर डोके ठेवून आठवण त्याची करीत आहेस!’
‘मंगा, किती झाले तरी तो आपला लहानपणाचा मित्र. तो घरी एकटा असतो. हसत नाही. बोलत नाही. त्याची आठवण करणेही का पाप? असा दुष्ट नको होऊ गडया.’
‘नाही हो होणार, तू जवळ असलीस म्हणजे दुष्टपणा माझ्याजवळ येणार नाही. मधुरी, प्रेम मत्सरी असते. मी किती झाली तरी मनुष्यच नाही का?’
‘हो, आपण माणसेच.’
‘मधुरी, तू आता दमलीस. आपण अशी किती दिवस भटकणार? हिंडणार? कोठे तरी आपण राहिले पाहिजे. झोपडी केली पाहिजे. परंतु एकसुध्दा दिडकी मजजवळ नाही. काय करावयाचे?’
‘मंगा तुल मी एक विचारु?’
‘विचार.’
‘रागवणार नाहीस ना?’
‘नाही.’
‘मी आज रात्री बुधाकडे जाते, त्याच्याजवळ पैसे मागते व घेऊन येते. तो देईल. जाऊ का?’
‘रात्री जाणार?’
‘हो. मग केव्हा जाऊ? तुला का शंका आली? शंका आली असेल तर मला या समुद्रात शिरु दे. मित्राकडे केव्हाही जायला भय नसावे. बुधा उल्लू नाही.’
‘मी आहे वाटते?’
‘थोडासा आहेस आणि म्हणूनच तू मला आवडतोस. तू रागवतोस; रुसतोस व बेफाम होतोस, म्हणून मला आवडतोस. मला शांत सरोवर नाही आवडत. खवळणारा, हसणारा समुद्र आवडतो.’