तीन मुले 84
‘कोठे आहे ती?’
‘आईने कोठे तरी ठेविली आहे. किती छान आहे बाबा.’
‘माधुरी कोठे आहे ग गोधडी?’
‘जाताना देईन. आधी नाही देणार.’
‘दाखव ना. मला पाहू दे.’
‘नाही... आयत्या वेळेला देईन तुझ्या वळकटीत मी बांधुन. तुला येथे नाही दाखवायची. तू गलबतात बसल्यावर मग ती गोधडी बघ. गलबत निघेल, रात्र होईल, वारा थंडगार वाहू लागेल, तुला थंडी वाजेल, मग तू वळकटी सोडशील, आणि ती गोधडी दिसेल. तू ती पांघरशील. तुला ऊब देईल. त्या चिंध्या नसतील हो मंगा! काय बरे ते असेल!’
‘त्या चिंध्या म्हणजे माझी मोलाची वस्त्रे.’
‘नाही.’
‘त्या चिंध्या म्हणजे माझे प्राण. त्या चिंध्या म्हणजे माझ्यावरचे तुझे प्रेम, होय ना?’
‘नाही.’
‘माधुरी मी कवी नाही.’
‘मंगा, त्या चिंध्या म्हणजे माझ्या हृदयाचे तुकडे. माझ्या हृदयाचा एकेक तुकडा कापून तो मी जोडून दिला आहे; खरे ना?’
‘होय हो मधुरी; परंतु मी जातो म्हणून वाईट नको वाटून घेऊस. तुझे हृदय मजजवळ असेल. ते मला तारील, ते मला सांभाळील.’
गावात सर्वत्र आता ही गोष्ट जाहीर झाली होती की मंगा जाणार कित्येकांना आश्चर्य वाटले.
बुधाच्याही कानावर कोणी तरी ही गोष्ट घातली. त्याला काय बरे वाटले? एके दिवशी मधुरी व मुले यांना बरोबर घेऊन मंगा बंदरावर आला. आजीबाईंच्या झोपडीत ही सारीजणे गेली. खाटेवर म्हातारी पडली होती, त्या सर्वांना पाहून तिला आनंद झाला.
‘आली माझी पाखरे.’ ती म्हणाली.
‘परंतु मोठे पाखरू आजी उडून जाणार आहे.’
‘मोठया पक्षांना पंख फडफडवीत लांब गेल्याशिवाय चैन पडत नाही; त्याच्या पंखांची शक्ती जाते नाही तर.’ म्हातारी म्हणाली.
‘सोन्या, तुम्ही जा, खेळा. भांडू नका मात्र. डोक्यात वाळू उडवू नका. शिंपा, कवडया आणा गोळा करून.’
‘शंख पण आणू आई?’ रुपल्याने विचारले.
‘हं, आणा.’ मधुरी म्हणाली.
‘सोन्या व रुपल्या खेळायला गेले. मनी तेथेच खेळत होती.
‘मंगा, नसता गेलास तर नसते का चालले?’