तीन मुले 74
‘आई, जाऊ दे ना बाबांना!’
‘नको हो. कशाला कोठे जा.’ मधुरी म्हणाली.
‘तू भित्री आहेस आई. जा हो बाबा तुम्ही. सोन्या म्हणाला.
‘बरे, नीज आता.’ मधुरी म्हणाली.
‘मधुरी, खरोखरच माझ्या मनात दूर देशी जावे असे येत आहे. अशी स्वप्ने मी खेळवीत असतो. खूप पैसा आणीन. मधुरीला सुखात ठेवीन. तिला सोन्याने मढवीन, पिवळी करीन, असे मनात येते. रोज उठून हल्ली ददात. रोजची वाण. दोन दिवस आपण परस्परांपासून दूर राहू; परंतु पुढे कायमचे सुख मिळेल. थोडी कळ सोसावीच लागते मधुरी. कष्टाशिवाय काही नाही. जाऊ का मी? देशोदेशीच्या गोष्टी मी बंदरावर ऐकतो. खलाशी किती गंमती सांगतात. मला बंदरात ती ओझी वाहण्यात आनंद नाही वाटत. एक दिवस येईल - माझ्या मालाचे गलबत येईल. माझा माल हमाल उतरत असतील, अशी स्वप्ने मनात येतात. मधुरी, जाऊ का? उद्यापासून नाही मी जाणार बंदरावर काम करायला.’
‘नको जाऊस मंगा. तू घरी राहा, मनीला खेळव. मी मोलमजुरी करीन. तू तरी किती दिवस करणार? मंगा, मी मिळवीन. तू घरी राहा. परंतु जाऊ नकोस कुठे. माझ्याजवळ राहा. मला सोडून जाऊ नकोस. तू गेलास तर मी मरेन. मग मुलांचे कसे होईल?’
‘मधुरी, मरायला काय झाले? आपणास वाटते की, आपले प्रिय माणूस गेले तर आपण मरु. थोडा वेळ वाटते वाईट. मागून पुन्हा मन शांत होते. मनुष्य आपल्या उद्योगात रमतो. उगीच वेडयावाकडया कल्पनांत नको रमू. जरा धीट हो. मुळूमुळू रडणारी मधुरी मला नाही आवडत.’
‘मंगा, मधुरी रडणारी आहे ही गोष्ट तुला लहानपणापासून माहीत होती. वाळूचे किल्ले आपले नीट झाले नाहीत तरी मला रडू यावे. तू व बुधा भांडत असा व माझे डोळे भरुन यावे. तू मला त्या वेळेसही म्हणत असस, रडणारी आहेस. रडूबाई आहेस! अशा रडूबाईजवळ कशाला केलेस लग्न?’
‘तू तरी माझ्याजवळ कशाला केलेस?’
‘तू माझे डोळे पुसशील म्हणून. मी रडणारी, न रडणारा कोणी तरी मला पाहिजे होता. माझे अश्रू पुशील, मला धीर देईल, असा आधार मला पाहिजे होता. मंगा, तू गेल्यावर माझे अश्रू कोण पुशील?’
‘मी आल्यावर पुशीन. मधुरी, गरिबीत राहावे असे तुला कसे वाटते?’
‘मंगा, मनुष्याला कितीही मिळाले म्हणून का समाधान होते?’
‘ते काही नाही. मी जाणार हो मधुरी. सांगून ठेवतो.’
‘अरे बघू. आता नीज.’
सकाळी सारी उठली. मंगा आज लौकर उठला नाही. मधुरीने त्याला हाक मारली नाही. उलट मंगाच्या अंगावर तिने आणखी पांघरुण घातले. मुले केव्हाच उठली होती. ती गडबड करीत होती.
‘सोन्या, रुपल्या, गडबड नका करु.’ मधुरी सांगू लागली.
‘आई, बाबांना बरे नाही? का ग ते निजले आहेत?’ सोन्याने विचारले.
‘त्यांच्या कानात आपण कुर्र करु. रुपल्या म्हणाला. तिकडे मंगाने डोक्यावरचे पांघरुण दूर केले. त्याचे डोळे उघडे होते. मुले त्याच्याजवळ गेली. त्याच्याजवळ बसली.