तीन मुले 128
‘मी तुमच्या पाया पडतो.’
‘पण मला पाझर फुटणार नाही.’
‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना?’
‘होय.’
‘ज्याच्यावर प्रेम असते, त्याच्यासाठी आपण वाटेल ते करतो ना?’
‘हो.’
‘मग तुम्ही मला माझ्या स्वदेशास जाऊ द्यावे. ज्यात माझा आनंद, त्यात तुम्ही स्वत:चा माना. माझी मधुरी अशी आहे. ती मला प्रवासास जाऊ देत नव्हती. परंतु मी हट्ट धरला. शेवटी ती म्हणाली, तुम्हांला घरी नसेलच बरे वाटत तर जा. तुमच्या मनाचा आनंद त्यातच माझा. अशी माझी मधुरी आहे. तिनेच म्हणावे की, मंगावर माझे प्रेम आहे. परंतु तुम्ही कसे म्हणू शकाल?’
‘तुमच्याशिवाय मीही जगू शकणार नाही.’
‘असे सगळे बोलतात आणि सगळे जगतात. क्षणभर माणसास वाईट वाटते.’
‘तुम्हांला एक विचारू?’
‘विचारा.’
‘येथे मौल्यवान वस्त्रप्रावरणे असता ती गोधडी पांघरून तुम्ही का निजलेत? राजाला हे कळले तर तो रागावेल.’
‘तुमच्या सर्व मौल्यवान वस्तुपेक्षा ती चिंध्यांची गोधडीच मौल्यवान वस्तूंपेक्षा ती चिंध्यांची गोधडीच मौल्यवान आहे. ती गोधडी म्हणजे माझे सर्वस्व, माझे जीवन.’
‘ती का मंतरलेली आहे?’
‘हो. तिनेच मला खवळलेल्या सागरात तारले.’
‘कोणी दिली ही तुम्हांला?’
‘मधुरीने-माझ्या पत्नीने. आणि देताना ती म्हणाली, माझ्या हृदयाचे तुकडे कापून त्यांची ही गोधडी मी शिवली आहे. खरेच जाऊ द्या हो मला माझ्या मधुरीकडे. ती वाट पहात असेल. किती तरी दिवस झाले, ती रडत असेल. मुले सारखी आठवण करीत असतील. येथे तुरुंगात पडून किती तरी दिवस झाले. मला का येथेच नजरकैदेत ठेवणार? पिंज-यात पोपटाला ठेवणार? झुरून झूरून हा पोपट मरेल.’
‘झुरून झुरून मीही मरेन. देवाने तुम्हांला इकडे का आणिले?