तीन मुले 52
‘तुला वर येववेल?
‘तू ने मला उचलून.’
‘तू जड आहेस.’
‘मंगा, किती रे माझे वजन वाढले असेल? थट्टा करतोस?’
‘बरे. नेतो उचलून खांद्यावर.’
मंगाने मधुराला खांद्यावर घेतले व टेकडीवर नेले. तिला खांद्यावर घेऊन तो नाचला.
‘पुरे.’ ती म्हणाली.
मधुरी, आपण लग्नात दुस-याच्या खांद्यावर बसून एकमेकांवर गुलाल थोडाच उधळला? खरे ना? तू म्हणालीस, आपले लग्न समुद्राने लावले; त्याने फेस उधळला तेवढा पुरे. नकोत इतर समारंभ. परंतु आज मी तुला नाचविले.
‘आणि तुला कोण नाचवील?’
‘तू आहेस ना मला नाचविणारी. माझे हृदय नाचवितेस, रोमरोम नाचवितेस.’
‘खरेच का मंगा?’
‘हो.’
‘मी का जादुगारीण आहे?’
‘नाही तर काय! मी श्रीमंत होणार होतो. परंतु श्रीमंताची मुलगी व श्रीमंती मी झिडकारली. आईबाप सोडले. कोणी सोडायला लावले? कोणी केली ही जादू?’
‘आणि मी रे? मी नाही का बुधाची संपत्ती सोडली? मी नाही का घरदार, आईबाप सोडले? मंगा तू सुध्दा जादूगार आहेस. तुला कल्पना नसेल परंतु तूही मला नाचवतोस. या टेकडीवर मी कितीदा आले आहे. घरी कोणी मला टोचून बोलावे व येथे येऊन मी बसावे, रडावे. येथील अणूरेणू मला शांतवी. येथे मंगाची मूर्ती मला दिसे. मंगा, तुझे पाय जेथे पडले तेथील मातीही मधुरीला नाचविते. वाकविते. पुरुष अधिक जादूगार असतात हो.’
असे म्हणून मधुरीने मंगाच्या डोळयांकडे मधुरपण पाहिले. दोघे हसली.
‘पड जरा मधुरी.’ तो म्हणाला.
‘तुझी मांडी म्हणजे माझी उशी.’
दुस-या चांगल्या उशा मला कोठे देता येताहेत! ना नीट गादी ना नीट उशी. मंगा गरीब आहे.’
परंतु कशाला दुस-या उशा! ही उशी छान आहे. सजीव उशी. थरथरणारी उशी. मंगा तू नेहमी आपली गरिबी मनाला का लावून घेतोस? अशाने तू वाळून जाशील. चिंतेने, काळजीने काळवंडशील. मला आनंद आहे हो गरिबीत. तुझे हसणे बोलणे मला मिळाले. तू माझा हात प्रेमाने हाती घेतलास, की मी राजाची राणी असते. खरेच हो मंगा.