तीन मुले 55
‘मंगा, रात्री नको जात जाऊ. मला रात्री एकटीला भय वाटते.’
‘आपल्याकडे चोर येणार नाहीत, आणि मी परत तर येतो.’
‘मध्यरात्रीनंतर येतोस. माझे डोळे तुझ्या वाटेकडे असतात. तू घरात नसलास म्हणजे बाळ रडतो. तू घरी असतोस तेव्हा कसा लबाड झोपी जातो. मुळी उठत नाही. परंतु तू कामाला जातोस त्या दिवशी जरा निजत नाही.’
‘तू एकटी विचार करीत बसू नये म्हणून बाळ जागा राहून तुला सोबत करतो. त्याला आईचे दु:ख कळते.’
‘पण नको जात जाऊ कामाला. दिवसा काम करतोस तेवढे पुरे. पैसे का कधी पुरेसे झाले आहेत?’
‘मधुरी, बुधाचे दोनशे रुपये मी परत करणार आहे.’
‘हे काय डोक्यात घेतलेस? त्याने कधी तरी मागितले का? ते पैसे आपण परत केले तर बुधा दु:खाने मरेल. मंगा, नको असे करु.’
‘लोक मला नावे ठेवतात.’
‘लोकांना काय माहीत?’
‘लोकांत कुणकुण आहे खरी.
‘म्हणू दे लोकांना वाटेल ते परंतु पैसे परत नाही करायचे. ते माझे पैसे होते. बुधाचे नव्हते.’
‘बुधाने का सारी धनदौलत तुला दिली आहे?’
‘हो.’
‘तू ती घेतलीस?’
‘हो.’
‘मधुरी, बुधावर तुझा जीव आहे. कबूल कर.’
‘मी त्याची आठवण कशी विसरु?’
‘त्याच्याकडे जातेस राहायला? त्याची राणी हो. जातेस?’
‘मंगा काय बोलतोस तू? का वर्मी घाव घालतोस? नाही हो आजपासून बुधाचे नाव काढणार. देऊन टाक हो त्याचे पैसे. तुझी इच्छा ती माझी इच्छा. माझे प्रेम तुझ्या इच्छेसाठी आहे.’
मधुरी रडू लागली. सोन्याला घेऊन बसली. संसार म्हणजे गुंतागुंती. कटकटी. यातायाती. परंतु वडाचे प्रचंड झाड दगडधोंडयांतूनच वाढते व शीतल छाया देते. संसाराचा वृक्षही कटकटीतूनच वाढतो. शेवटी सुखवितो, शांतवितो.’