तीन मुले 23
‘तुला शंभरदा सांगितले की याचा नाद सोड. येथे येऊन गुलगुल गोष्टी करीत बसलीस. तुला लाज नाही वाटत?’
‘बाबा, इतरांजवळ बोलायला मला लाज वाटते. मंगाजवळ बोलायला कसली लाज? मंगा माझा आहे.’
‘पुन्हा बोल.’
‘मंगा माझा आहे.’
‘मधुरी, थोबाड फोडीन. पुन्हा बोल.’
‘थोबाड फोडा. मी मरेपर्यंत सांगेन की मंगा माझा आहे. आणि बापाने खरेच मधुरीच्या थोबाडीत मारली. मंगा त्याच्या अंगावर धावला. परंतु मधुरीने त्याला दूर केले.
‘बाबा, मारीत मारीत मला घरी न्या. मारा, मुलीला मारा.’
आणि खरोखर बाप मधुरीला मारीत घेऊन निघाला. मंगा टेकडीवर एकटाच बसला. त्याचे डोके भणाणले होते.
आता मधुरीचा बाप तिच्या लग्नाची जोराने खटपट करु लागला. एके दिवशी तो तिला म्हणाला,
मधुरी, मी ठरवीन त्याच्याशी करशील का लग्न?’
‘नाही बाबा.’
‘मधुरी, विचार करुन उत्तर दे.’
‘नाही, तुम्ही ठरवाल त्याच्याजवळ मी उभी राहणार नाही. मंगाशी मधुरीचे लग्न लागलेले आहे.
‘कोणी लाविले?’
‘उचंबळणा-या समुद्राने, त्या टेकडीने; लाटांनी, आमच्या हातांनी, आमच्या डोळयांनी; काय सांगू बाबा?’
‘काही सांगू नकोस. माझ्या घरात राहावयाचे असेल तर माझी इच्छा प्रमाण.’
‘बाबा, माझे लग्नच राहू द्या मी अशीच घरात राहीन. दळण दळीन भांडी घाशीन. माझ्या मंगाला मी मनात ठेवीन, आणि तुम्हीही दुसरा कोणी पाहू नका.’
‘लोक मला हसतील. तुला का अशीच ठेवू? आणि तुझ्या हातून उद्या वेडेवाकडे झाले तर? ते काही नाही. तुला माझे म्हणणे ऐकलेच पाहिजे. तू विचार करुन ठेव.’
मधुरी काय विचार करणार?