तीन मुले 73
‘मंगा, अलीकडे तू वेळच्या वेळी घरी का येत नाहीस? सोन्या-रुपल्या तुझी वाट पहात असतात. केव्हा येतील बाबा असे सारखे विचारीत असतात. घरापेक्षा का गलबत आवडते झाले? मुलाबाळांजवळ बोलण्यापेक्षा खलाशांजवळ बोलण्यातच तुला अधिक आनंद वाटतो होय?’
‘मधुरी, चल आता घरी जाऊ. दे मनीला माझ्याजवळ ती निजेला आली आहे. मी खांद्याशी धरतो. ती निजेल.’
मंगाने मनीला घेतले. खांद्याशी धरिले. ती झोपी गेली. दोघे घरी आली. सोन्या व रुपल्या दारातच होते.
‘बाबा आले, आले बाबा.’ दोघे ओरडले.
तेथे झोपाळयावर मंगाने मनीला ठेवले. सोन्या व रुपल्या त्याच्याजवळ आले. त्याने दोघांना जवळ घेतले. त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवला.
‘बाबा, गोष्ट सांगता एक?’ सोन्याने विचारले.
‘आता जेवल्यावर गोष्ट. चला जेवायला.’ मधुरी म्हणाली.
जेवणे झाली. तेथे अंगणात चटई टाकून सारी बसली. मधुरीच्या मांडीवर मनी होती.
‘हं, सांगा बाबा गोष्ट, मोठी, न संपणारी सांगा.’ सोन्या म्हणाला.
मंगा गोष्ट सांगू लागला..... एक होता मनुष्य. तो गरीब होता. घरी दोनचार कच्चीबच्ची होती. सर्वांचा सांभाळ कसा करणार तो? तो नेहमी दु:खी कष्टी असे. काय करावे त्याला कळेना. तो आपल्या बायकोस एके दिवशी म्हणाला, जाऊ मग कोठे दूर देशाला. नशिबाची परीक्षा पाहतो. पैसे मिळवीन तेव्हाच घरी येईन. परंतु त्याची बायको रडू लागे व म्हणे, जळले मेले पैसे. काय चाटायचे आहेत? कोंडयाचा मांडा करु. सुखात राहू. नका जाऊ आम्हाला सोडून दूर. परंतु एके दिवशी त्या मनुष्याच्या मनात फारच जोराने विचार आला. तो अस्वस्थ झाला. तो पत्नीला म्हणाला, गेल्याशिवाय माझ्याच्याने जगवणार नाही. तू परवानगी दे. येथे मला राहवत नाही. मी मरुन का जाऊ? काय बोलणार बिचारी? शेवटी ती म्हणाली, जा. तुम्हाला नसेलच राहवत तर जा. देव आहेच सांभाळणारा. आणि एके दिवशी तो खरेच गेला. एका गलबतात बसून गेला. पुष्कळ दिवस झाले. परंतु त्याचा पत्ता लागेना. रोज बायको व मुले वाट पाहात, आणि शेवटी तो एके दिवशी आला. प्रथम त्याला कोणी ओळखले नाही. परंतु तो बोलू लागताच सर्वांनी त्याला ओळखले. सर्वांना आनंद झाला. त्याने मुलांसाठी किती तरी गमती आणल्या होत्या. बायकोसाठी दागिने आणिले होते. त्याचे दारिद्र्य गेले. त्याचा संसार सुखाचा झाला.
‘संपली का गोष्ट.’ सोन्याने विचारले.
‘हो.’ मंगा म्हणाला.
‘छान आहे गोष्ट.’ सोन्या म्हणाला.
‘का रे?’ बापाने प्रश्न केला.
‘त्या मुलांना गंमती मिळाल्या म्हणून.’ सोन्या म्हणाला.
‘तुला पाहिजेत अशा गंमती?’ मंगाने विचारले.
‘परंतु तुम्ही कोठे दूर जाता?’ बाबा, तुम्ही का नाही दूर जात? मग आम्हाला जमती आणाल. आईला दागिने आणाल. आपण श्रीमंत होऊ. बंगल्यात राहू. जा ना हो बाबा कोठे.’ सोन्या म्हणाला.
खरंच जाऊ मग मी लवकर आलो नाही तर रडशील हो. तुझी आई रडेल. आईला विचार बरे!’