तीन मुले 6
‘आणा सगळयांच्या खारका. मी सा-या खाऊन टाकतो. द्यायच्या असतील तर सा-या द्या. मधुरी, तुझ्या तिन्ही खारका दे.’ तो म्हणाला.
‘घे हो मंगा, पण रागावू नकोस.’ ती म्हणाली.
‘आणि मधुरी, माझ्या तिन्ही तू घे.’ बुधा म्हणाला.
‘त्याच्या घेतल्यास तर बघ.’ मंगाने धमकी दिली.
‘मधुरीला मुळीच नकोत वाटते?’ बुधाने विचारले.
‘मला मिळाल्या म्हणजे तिला मिळाल्या.’ मंगा म्हणाला.
‘आणि तिला मिळाल्या म्हणजे मला मिळाल्या. घरी आणखी घेईन व खाईन, घे ग मधुरी.’ बुधा म्हणाला.
‘तुम्ही दोघे मला रडकुंडीस आणता. त्या दिवशी तू समुद्रात डुंबत राहिलास. हा बुधा सारखे सांगे, घरी चल. मी जावे की रहावे, माझी आपली ओढाताण. दोघे भांडता व रडवता. आणा सा-या खारका मजजवळ; मी नीट वाटते. उतरतील त्या दातांनी फोडून सर्वांना वाटीन. आणा.’ ती म्हणाली.
‘या घे.’ बुधा म्हणाला.
‘या घे.’ मंगा म्हणाला.
‘आता कसे शहाणे झालात.’ ती हसून म्हणाली.
तिने चिमणीच्या दातांनी फोडून सारख्या वाटल्या. तिघांनी त्या खाऊन टाकल्या.
‘आपण बिया रुजत घालू.’ बुधा म्हणाला.
‘येथे त्याची झाडे होत नाहीत.’ मंगा म्हणाला.
‘आपण त्या बिया समुद्रात फेकू. जेथे खारकांची झाडे होत असतील, तेथे हया बिया तो घेऊन जाईल.’ मधुरी म्हणाली.
‘मधुरी, तू वेडी आहेस. समुद्राच्या लाटांवर त्या बिया वाटेल तिकडे जातील. परंतु त्या तरंगतात थोडयाच! त्या बुडतील.’ मंगा म्हणाला.
‘मला काही कळत नाही.’ मधुरी म्हणाली.
‘मला सारे कळते.’
‘आम्हांस शिकवीत जा. मधुरी म्हणाली.