तीन मुले 96
‘बरं, हा तुझ्या भावंडांना ने. हा आईला ने.’
‘आईचा आम्हालाच मिळेल.’
‘तुम्ही घेऊ नका. तिला खायला लावा.’
आणि सोन्या खाऊ घेऊन आला. त्याने लहान भावंडांना दिला. रुपल्या आणखी मागू लागला. सोन्या रागे भरला. आज त्याला आपण मोठे आहोत असे वाटत होते. पुरे तेवढा. एकदम का संपवायचा आहे? असे त्याला पोक्तपणे सांगत होता. आई घरी आल्यावर त्याने तिला सारी हकीकत सांगितली.
‘आई, तू खा ना खाऊ?’ सोन्या सांगू लागला.
‘तुम्हांलाच होईल. मी का लहान?’ ती म्हणाली.
‘ते मला विचारतील. मग काय सांगू?’
‘सांग आईने खाल्ला म्हणून.’
‘खोटेच? आई, थोडा तरी वडीचा तुकडा खा. नखाएवढा.’ सोन्याने आईच्या तोंडात तुकडा दिला. आईने खाल्ला. बुधाच्या घरचा खाऊ.
एके दिवशी मधुरीचे पोट दुखू लागले.
‘सोन्या. जा बंदरावरच्या आजीला बोलावून आण.’ ती म्हणाली. सोन्या धावतच गेला. तो आजीला घेऊन आला.
‘काय मधुरी?’ ती जवळ बसून म्हणाली.
‘पोट दुखत आहे. तू येथेच रहा दहा दिवस.’
म्हातारीने सारी तयारी केली. मुले घिरटया घालीत होती. बाहेर खेळत होती. पोट बरेच दुखत होते. काय करावे? शेवटी एकदाचे मूल बाहेर आले. परंतु जिवंत नव्हते. ते मृत मूल होते. मधुरीला वाईट वाटले. म्हातारी तिला समजावत होती. दोन दिवस गेले. मधुरी खिन्नपणे खाटेवर पडली होती.
‘आजी, नाव काय ठेवावयाचे तेही आम्ही ठरवून ठेवले होते.’
‘काय ठेवावयाचे.’
‘मुलगा झाला तर मोती नाव ठेवू. मुलगी झाली तर वेणू, असे मंगा सांगून गेला होता. परंतु मोत्याचा चूर झाला. वेणू पिचली. आजी, हा अपशकुन तर नाही ना? वेडेवेडे माझ्या मनात येत आहे.
‘तू हातीपायी नीट सुटलीस यातच आनंद मान. आहेत तीन मुले. त्यांना वाढव. डोळे पूस. मनाला लावून घेऊ नकोस.’ म्हातारी समजूत घाली.
दिवस भरभर जात होते. म्हातारी पुन्हा बंदरावरच्या झोपडीत गेली. मधुरी कामधंद्याला जाऊ लागली. एखादे वेळेस तिला वाटे, नवीन बाळ देवाने नेले, बरे केले. ते घरात असते तर मी कामाला जाऊ शकले नसते. मुलांना कसे पोसले असते? देव करतो ते ब-यासाठी. परंतु हा विचार तिला आवडत नसे, असे मनात येऊन तिला रडू येई.