तीन मुले 149
मंगा बाहेर उभा होता.
‘सोन्या, बघ दाढीवाला.’ रुपल्या म्हणाला.
‘खरेच की.’ मनी येऊन म्हणाली.
सोन्याही आला. त्या दाढीवाल्याकडे तिघ पहात राहिली.
‘कोण पाहिजे तुम्हांला?’ सोन्याने विचारले.
‘तुमच्या दिवाणखान्यात एक मोठे चित्र आहे; ते मला पहावयाचे आहे.’
‘पहिल्या बाबाचे?’ रुपल्याने विचारले.
‘हो.’ मंगा म्हणाला.
‘या वरती. कसे छान आहे चित्र! आईला फार आवडते. या वर.’
त्या मुलांनी मंगाला वर नेले. सुंदर दिवाणखाना होता. मऊ-मऊ गालिचे पसरलेले होते आणि ती सुंदर तसबीर होती.
‘हे आमच्या पहिल्या बाबाचे चित्र.’ सोन्या म्हणाला.
‘आणि हे आमच्या आईचे.’ रुपल्या म्हणाला.
मंगाने मधुरीचे ते चित्र पाहिले. स्वत:चेही चित्र पाहिले. तो उभा राहिला.
‘तुम्हांला आवडली का ही चित्रे?’ सोन्याने विचारले.
‘हो. सुरेख आहेत. कोणी काढली ही?’
‘बुधाकाकांनी.’
‘तुम्ही का त्यांना बुधाकाका म्हणता?’
‘कधी कधी बाबाही म्हणतो.’ रुपल्या म्हणाला.
‘तुम्हांला आवडतात का ते?’
‘हो. ते आम्हांला जवळ घेतात. खाऊ देतात. गोड गोष्टी सांगतात.’
‘बरे मी जातो.’
मंगा गेला. मुले पहात राहिली.
‘तो बोवा का रडत होता आईचे चित्र पाहताना?’ रुपल्याने विचारले.
‘आईसुध्दा कधी कधी बाबांचे चित्र पाहताना रडते.’ मनी म्हणाली.
‘त्याची दाढी छान दिसे नाही?’ सोन्या म्हणाला.
‘मला तर भीती वाटे.’ मनी म्हणाली.