तीन मुले 26
‘जनात?’
‘जनातही लागेल.’
‘तुझा बाप तयार आहे?’
‘नाही.’
‘मग?’
‘मी घरातून निघून जाईन.’
‘कोठे राहशील?’
‘समुद्रकाठच्या टेकडीवर.’
‘तेथे कोण येईल?’
‘मंगा येईल व मला घेऊन जाईल.’
‘मधुरी!’
‘काय बुधा?’
‘मला विसरु नकोस. मी तुझे स्मरण करीत बसेन. तू एखादे वेळेस तरी दिवसातून माझी आठवण करीत जा.’
‘मी तुला विसरणार नाही. घे हे फूल. मला जाऊ दे.’
‘फूल राहू दे. थोडा तरी माझा वास तुझ्याजवळ राहू दे.’
‘ते बघ बाबा येत आहेत. नको फूल. ते रागावतील.’
‘मधुरी, नाही म्हणू नकोस. मी ते तुझ्या केसांत घालतो.’
‘बुधा, रस्त्यात असे काय वेडयासारखे करतोस?’
इतक्यात मधुरीचा बाप तेथे आला. तो रागाने लाला झाला होता.
‘काय हा चावटपणा? श्रीमंत झालेत तर घरचे. रस्त्यात गरिबाच्या मुलीला का धरता? लाज नाही वाटत? रस्त्यातून गरिबांच्या मुलींना फिरणेही कठीण झाले एकूण. हो दूर-चावट कुठला.’
‘जपून बोल.’ बुधा म्हणाला.
‘अरे जा, जपून बोल म्हणणा-या. एक थप्पड मारीन तर पाणी पाजीन. नीघ पाप्याच्या पितरा. फुंकरीनं उडून जाशील.’
‘बुधा, जा. नको हे फूल.’