तीन मुले 66
‘तोच मला बोलला.’
‘काय बोलला?’
म्हणाला, ‘तू मधुरीला मारीत आहेस.’
‘अरेरे! वेडा आहे. मंगा, तो निराश झालेला आहे. आजारी मनुष्य ज्याप्रमाणे चिरचि-या होतो, त्याप्रमाणे निराश मनुष्यही एखादे वेळेस वाटेल ते बोलतो. तू ते मनाला लावून नको घेऊस. सारे काढून टाक हो. बुधाचे मन चांगले आहे. तुझ्याविषयी त्याला आपलेपणा वाटतो. तो बोलून नसेल दाखवीत.’
मंगा ऐकत होता. मधुरी त्याला थोपटीत होती. तो झोपी गेला. मधुरी जरा अस्वस्थ झाली होती. ती एकटा बाहेर अंगणात आली. कोणी दिसते का ते पाहू लागली. ती का भूत पहात होती? ती तेथे झोपाळयावर बसली. आकाशात चंद्र आता फुलला होता. अंगणातील कळयाही फुलू लागल्या होत्या. समुद्राची धीरगंभीर गर्जना ऐकू येत होती. गार गार वारा येत होता. मधुरी विचारांच्या तंद्रीत होती. बुधा व मंगा यांच्याभोवती तिचे मन रुंजी घालीत होते. ते एकमेकांचे वाईट नाही ना करणार? ते भूत खरे की खोटे? काही संकट तर नाही येणार? ते भूत सूड तर नाही घेणार? एक ना दोन, कितीतरी कल्पना तिच्या मनात येत होत्या.
शेवटी ती उठली. घरात येऊन निजली. मनीला कुशीत घेऊन ती निजली. तिचा तिने मुका घेतला. कशी सोन्यासारखी माझी मुले आहेत. परंतु या मुलांचे पुढे कसे होईल असे विचार का तिच्या मनात येत होते? गरिबांच्या मनात असे फारसे येत नाही. करतील मजुरी व खातील असे त्यांना वाटते. मुलांचे पुढे काय होईल ही चिंता पांढरपेशा मध्यमवर्गीयांसच अधिक असते.’
दिवाळी आली होती. मधुरीने घरात गोड केले होते. एके दिवशी सोन्या शेजारी गेला होता. तेथील मुले सांजो-या खात होती. सोन्याने पण मागितली. त्याला एक तुकडा देण्यात आला. तो घेऊन घरी आला. त्याने आईला दाखवला तुकडा.
‘तू कर ना’ असे तो म्हणाला.
‘कोणाकडून आणलीस सांजोरी? सोन्या, तुला शंभरदा सांगितले की कोणाकडून मागू नये म्हणून. आज पुन्हा गेलास का? थांब, तुला चांगली आठवण राहिली पाहिजे. चांगला डाग देते जिभेला म्हणजे कोणाकडे मागणार नाहीस पुन्हा.’ असे म्हणून मधुरीने त्याचा हात धरून त्याला घरात ओढीत नेले. सोन्या रडू लागला. चुलीतील कोलीत तिने हाती घेतले.
‘मागशील पुन्हा? मागशील? वेंगाडशील तोंड दुस-याकडे? का लावू डाग जिभेला? कोणता हात पुढे केलास घ्यायला? हातालाच भाजते म्हणजे हात पुढे होणार नाही.’’
‘नको ग आई, नको, नको. नाही हो पुन्हा मागणार, नाही कोणाकडे जाणार. नको भाजू आई, आई!
‘नको कसे? मागे असाच गेला होतास खायला. त्या वेळचा मार आठवत नाही? पुन्हा गेला आज. भिकारडा. जसा हपापला आहे खाण्याला मेला. जसा उपाशी मरतच होता. ते काही नाही. कर, हात पुढे कर. आणि मधुरीने त्याच्या तळहातावर ते कोलीत ठेवले. पोर कळवळले.’