तीन मुले 122
‘मधुरीची चित्रे वाट पाहातील. मी गेलो म्हणजे त्या चित्रांना
बघतो, हृदयाशी धरतो.’
‘आणि ती तुझ्याजवळ बोलतात?’
‘हो; किती तरी बोलतात, हसतात, रडतात.’
‘निर्जीव चित्रे.’
‘ती माझा स्पर्श होताच सजीव होतात. जातो आता मधुरी.’
‘थांब. दिवा लावते. दिव्याला नमस्कार करून जा.’
मधुरीने दिवा लावला. मुले इकडतिकडे फिरत होती. मनी स्वत:भोवती फिरत होती.
‘बुधा, हा बघ दिवा.’
‘माझ्या घरात केव्हा लावशील दिवा?’
‘वेळ येईल तेव्हा.’
‘जातो मी.’
‘बुधा, शांत मनाने जा.’
आणि बुधा गेला. मुले घरात गेली. जेवणे झाली. ती पाखरे झोपली. मधुरी विचारमग्न होती. तिला झोप येईना. केव्हा झोप लागली ते तिला कळले नाही. केव्हा तरी डोळा लागला.
एके दिवशी पुन्हा ती एकदा अशीच फिरायला गेली होती. मुले वाळवंटात खेळत होती. मधुरी व बुधा टेकडीवर बसली होती. दोघे गंभीर होती. मुकी होती.
‘बुधा, आज तू बोलत का नाहीस?’
‘काय बोलू?’
‘काही तरी बोल. तू असा का? काही होते का तुला?’
‘मनाच्या कळा कुणाला सांगू?’
‘मला सांग. तुझ्या मधुरीला सांग.’
‘तू माझी आहेस? ‘
‘लहानपणापासून आहे. मी का तुला परकी आहे? तू मला परका आहेस? तसे असते तर मी पैसे मागायला तुझ्याकडे आल्ये असते का?’
‘मधुरी?’
‘काय?'
‘तुला एक विचारू?'
‘विचार हो बुधा.
‘तुला राग येणार नसेल तर विचारतो. वाईट नसेल वाटणार तर विचारतो.’
‘विचार.’