तीन मुले 16
‘काही म्हणा, परंतु असतात. बेडी लोखंडाची असली काय व सोन्याची असली काय; बेडी ती बेडीच.
‘आज तुम्ही गरिबाकडे कोठे आलात?’
‘मधुरीला मागणी घालण्यासाठी.’
‘काही तरी बोलता.’
‘काही तरी नाही, थट्टा-मस्करी नाही. गंभीरपणेच मी बोलत आहे. तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी मी आलो आहे. करीन लग्न तर मधुरीशीच अशी त्याची प्रतिज्ञा आहे.’
‘ती प्रतिज्ञा तुम्हांसही मान्य आहे का?’
‘मान्य नसली तरी मुलासाठी सारे करावे लागते.
‘आम्ही गरीब मजूर. तुम्ही श्रीमंत. सोयरीक कशी जमणार? लोक तुम्हांला हंसतील. मलाही म्हणतील की, मुलीचे पैसे घेतले असतील.’
‘खरे आहे तुमचे म्हणणे.’
‘माझी मधुरी श्रीमंताकडे मी कधीही देणार नाही.’
‘तुम्ही आपण होऊन श्रीमंताकडे देण्यासाठी जाऊ नका. परंतु श्रीमंत आपण होऊन तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी आला तर त्याला नाही म्हणू नका.’
‘श्रीमंतांचा तुम्हाला इतका का तिटकारा?’
‘तुम्हीच त्याचे उत्तर द्या.’
‘सारे श्रीमंत का वाईट असतात?’
‘बहुतेक असतात. गरिबांना ते तुच्छ मानतात. त्यांना दूर बसवितात. श्रीमंतांच्या कुत्र्याइतकीही आम्हांला किंमत असत नाही. नको. माणुसकी मारणारी श्रीमंती नको. उपाशी ठेवणा-या गरिबीत मी आनंदाने राहीन. परंतु गर्वांध करणारी श्रीमंती मी स्वीकारणार नाही. माझी मुलगी श्रीमंताकडे दिली तर न जाणे तीही गरिबांचा अपमान करु लागेल. कदाचित माझ्याकडे यायलाही ती लाजेल. गरीब आईबापांना भेटायलाही उद्या तिला संकोच वाटेल. नको. माझी मधुरी मी एखाद्या गरिबाला देईन.’
‘परंतु तुम्ही मधुरीला कधी विचारले आहे का?’
‘तिलाही श्रीमंती आवडत नाही.’
‘परंतु माझ्या मुलाची ती बाळमैत्रीण होती. दोघे समुद्रावर एकत्र खेळत. एका हाती पतंग उडवीत. हात धरुन घसरत हातात हात घेत. पाण्यात जात. तुम्ही मधुरीला विचारा. तुम्ही तिच्या कलाने घेण्याचे ठरविले आहे ना?