तीन मुले 63
‘मंगा!’
‘बुधा!’
‘किती दिवसांनी आपण भेटत आहोत.’
‘पुन्हा त्याच लहानपणाच्या टेकडीवर.’
‘परंतु मधुरी मात्र बरोबर नाही. मधुरी बरी आहे ना?’
‘हो.’
‘मुलेबाळे बरी आहेत ना?’
‘हो.’
‘आता दिवाळी आली. मुलांना नवीन कपडे केलेस? मधुरीला नवीन पातळ घेतलेस का?’
‘बुधा, मी गरीब आहे.’
‘मधुरीला तू मारुन टाकशील मंगा. इकडे मी मरत आहे. तिकडे मधुरी मरत आहे.’
‘बुधा मधुरीचे मजवर प्रेम आहे. ती दु:खी नाही.’
‘बायका दु:ख दाखवीत नसतात. समुद्रावर फेस उसळतो, आत गंभीर असतो. बायका वर हसतात, आत दु:ख भरलेले असते. शेजारी सर्वत्र दिवाळीची तयारी होत असेल. मधुरी शिळे तुकडे मोडीत असेल. मुलांना डोळयांतील अश्रूंच्या हारांनी नटवीत असेल.’
‘बुधा, मी जातो.’
‘कोठे जातोस? हे बघ काय आहे समोर.’
‘कोठे?’
‘ते समोर.’
‘अरे बाप रे.’
‘कोण रे ते?’
‘माझ्या बाबांचे ते भूत. तू नाही ओळखलेस? एखादे दिवशी माझ्या खिडकीसमोर ते मला दिसते व चल अशी खूण करते. मी बाहेर पडतो. या टेकडीवर ते भूत मला घेऊन येते. माझ्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरविते. समुद्राकडे बोट करते व हसते. समुद्राप्रमाणे गंभीर राहा, हास, खेळ असे का बाबा सुचवितात?