तीन मुले 109
दिवाळी
दिवस जात होते. दु:खाचा विसर काळामुळे पडतो. हळूहळू दु:खाची तीव्रता कमी होते. मधुरीचे दु:ख कमी झाले. मधून मधून मंगाची तिला आठवण येई. परंतु आता ती एकसारखी रडत बसत नसे. मोलमजुरी करी. मुलांना सांभाळी. असे चालले होते आणि दिवाळीचा सण जवळ येत होता. त्या सणाने मधुरीला पुन्हा एकदा खूप दु:ख झाले. ती दोन वर्षापूर्वीची दिवाळी तिला आठवली. तिने सोन्याचा हात भाजला होता आणि मंगा गोरामोरा झाला होता. त्यामुळेच परदेशात जावयाला तो अधीर झाला होता. दारिद्र्याची चीड त्यामुळेच त्याला फार आली होती. परंतु तो आज नाही. दारिद्र्य दूर करण्यासाठी गेला. परंतु आज घरात अधिकच दारिद्र्य होते. मुलांचे कपडे फाटले होते. ती ते शिवी व त्यांना ठिगळे लावी; परंतु त्या चिंध्या पाहून तिला वाईट वाटे.
‘आई, आम्हांला नवीन कपडे कर.’ रुपल्या म्हणाला.
‘माझा सदरा फाटला आहे.’ सोन्या म्हणाला.
‘आपल्याजवळ पैसे नाहीत सोन्या.’ ती म्हणाली.
‘आम्हांला मुले हसतात.’ रुपल्या म्हणाला.
‘तू आण कोठून तरी पैस.’ सोन्याने सांगितले.
‘पैशाचे का बाळ झाड असते?’ ती म्हणाली.
‘आम्हांला नाही माहीत. नवीन आंगरखा दे म्हणजे झाले.’ रुपल्या बोलला.
मुले गेली बाहेर. परंतु मधुरीला खिन्न वाटले. काय या जीवनात राम, असे तिला वाटले, निराशा पसरली. तिला काही सुचेना इतक्यात बुधा आला. हसत हसत आला. जणू संगीत आले; प्रकाश चाला, आशा आली.
‘ये बुधा! ये.’ ती म्हणाली.
‘बरेच दिवसांनी आलो.’ तो म्हणाला.
‘का नाही मध्यंतरी आलास?’
‘वरचेवर आलो तर बरे दिसणार नाही म्हणून नाही आलो.’
‘येत जा रे बुधा. मला दूसरे कोण आहे? हल्ली मंगाची फार फार आठवण येते. दिवाळी आली. लोकांकडे पणत्या लावतील. दिवे लावतील; परंतु माझ्या घरी अंधार आहे. माझ्या कपाळी शोक आहे. माझ्या झोपडीत सारी वाण आहे. मंगा असता तर ही झोपडी फुललेली, आनंदाने भरलेली दिसती. पण कोठे गेला तो माझा पूर्णचंद्र? कोठे गेला माझा सूर्यनारायण? मंगा फुले तोडी व माझ्या केसांत घाली. त्या एका दिवाळीचे वेळेस त्याने असेच केले. मी रागावले त्याचेवर, म्हटले मी का आता लहान आहे? तीन मुलांची आई झाल्ये. तर त्याला वाईट वाटले. मंगा मनाचा मऊ होता. मंगाला थट्टासुध्दा सहन होत नसे. बुधा, का रे माझा मंगा गेला? माझे बाळ जिवंत नाही जन्मले. त्याच वेळेस माझ्या मनात चर्र झाले. काही तरी पुढे वाईट आहे असे वाटले. मधूनमधून मनाला वाटे की मंगाचे कदाचित हे शेवटचेच दर्शन असेल. बुधा, फार वाईट वाटते मला. तू येत जा. लोक म्हणोत वाटेल ते.’