तीन मुले 147
‘आता मधुरी आनंदात आहे ना?’
‘हो. कधी कधी ती दु:खी होते. या टेकडीवर येते. रडते. माझ्याकडे येते. माझ्या मांडीवर डोके ठेवून पडते. बुधा जणू आनंदाच्य सागरात आहे. मुले सुखी आहेत.’
‘मधुरी मंगाला विसरली नाही एकूण?’
‘कशी विसरेल? त्यांच्या दिवाणखान्यात मंगाचे एक मोठे चित्र भिंतीवर लावण्यात आले आहे. ती त्या चित्रासमोर डोळे मिटून उभी राहते व प्रणाम करते.’
‘मधुरी बुधाला मिठ्या मारते, होय ना?’
‘तोही लहानपणाचा मित्रच तिचा. असे कसे बोलता? ती काय सुखासाठी हपापली होती? चार मुलांची ती आई होती. बुधासाठी का ती गेली? मुलांसाठी गेली. मंगाचा आत्माही आशीर्वाद देईल अशी तिला आशा आहे. मधुरी थोर मनाची आहे. पवित्र आहे. तिच्या मनाची ओढाताण, कालवाकालव कोणाला कळेना.’
‘आणि मंगाची नंतर काही बातमी आली का?’
‘काही नाही. त्या गलबतातील कोणीही परत आले नाही.’
‘मधुरीला नवीन मूलबाळ झाले असेल का?’
‘हो. दोन नवीन मुले झाली आहेत. एक मुलगी व एक मुलगा आणि त्यांची नावे वेणू व मोती. मंगाने ती मधुरीला होणा-या मुलांसाठी सांगितली होती. मुलगी झाली तर वेणू. मुलगा झाला तर मोती. तीच नावे तिने या नव्या बाळांना ठेवली आहेत. छान आहेत मुले.’
‘मी जर निजतो आजीबाई. मला झोप येत आहे.’
‘झोपा हो. झोप लागली की बरे वाटेल. तुम्हांला विश्रांती हवी आहे. तुम्हांली कसली तरी चिंता आहे. हृद्रोग आहे. तुमच्या डोळयांतून पाणी येत होते. तुम्ही लपवीत होता. मला म्हातारीला सारे कळते. झोपा. पांघरून घेऊन पडा.’ ती गोड शब्दांत म्हणाली.
त्याला का झोप लागली होती? तो का शांत निजला होता? नाही; त्याला झोप लागली नाही. तो तळमळत होता. तडफडत होता. तो बेचैन होता. तो उठला व कोठे तरी जाण्यासाठी निघाला.
‘कोठे जाता?’ म्हातारीने विचारिले.
‘जातो फिरायला.’ तो म्हणाला.
‘गार वारा आहे. नका जाऊ. तापबीप यायचा एखादा.’
‘लौकर परत येईन. त्या वाळूंच्या टेकडीवर जाऊन जरा बसतो.’