तीन मुले 45
‘होय.’
‘ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याची इच्छा प्रमाण ना?’
‘होय.’
‘मग माझी इच्छा मान. माझी आज्ञा मान. या घरात राहा. आनंदाने राहा. माझी आठवण तुजजवळ आहे.
‘माझे प्रेम इतके निरपेक्ष नाही.’
‘तसे निरपेक्ष कर. खरे प्रेम मोबदला नाही मानत. माझ्यावर प्रेम करण्यातच धन्यता मान.
‘मधुरी, हे कठोर धडे मंगाला का नाही देत?’
‘त्याची अद्याप तशी लायकी नाही.’
‘मी का वरच्या वर्गातील?’
‘हो. चल मला पोचव. वरच्या वर्गातील आहेस असे सिध्द कर.’
‘तुझे चित्र काढू?’
‘नको आता. तुझ्या डोळयांसमोर मी आहेच नेहमी. तिकडे मंगा वाट पहात असेल. जाऊ दे मला. तो निराश झालेला आहे.’
‘निराश?’
‘म्हणतो समुद्रात जाऊ. नको हे जग.’
‘का असे म्हणतो?’
‘मधून मधून मनुष्य असं म्हणतो.
‘प्रेम अनंताची खोली दाखविते. जीवनमरण दाखविते. प्रेम एका क्षणात सारे मंगल व भीषण, शुभ्र व अशुभ्र यांचे दर्शन घडविते.
‘मला नाही समजत काय म्हणतोस ते. परंतु मरावे असे ‘ज्याच्या मनात येत नाही असा कोण आहे जगात?
‘कोणी नाही. सारे रडणारे व हसणारे.
‘हं. धर माझा हात व पोचव.
‘बुधाने तिचा हात धरला. जिन्यात क्षणभर थरथरत दोघे उभी होती. मधुरीने आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली. तिच्या डोळयांतून पाणी गळले. तिने चलण्याचा इशारा केला. दाराजवळ दोघे आली. कडी निघाली. दार उघडले गेले.
‘जातेस ना शेवटी ?
‘बुधा, रडू नकोस. नीट राहा. खात-पीत जा. मधुरी आनंदाने राहावी असे वाटत असेल तर खा, पी, हस, खेळ. बुधा माझ्या मनाची किती रे ओढाताण होत असेल? किती त्रेधा होत असेल? काही कल्पना कर. माझी कीव कर. माझ्यासाठी जगशील ना?