तीन मुले 38
‘बाबा माझ्या देवापासून माझी ताटातूट करु पहात होते. ते दुस-या कोणाजवळ तरी माझे लग्न करु इच्छीत होते. शेवटी मी भांडले. मला त्यांनी घरातून हाकलून दिले. मी बाहेर पडले. माझ्या मंगाच्या घरी आज राहायला आले.’
‘कोठे आहे मंगाचे घर?’
‘तुझे हृदय हे माझे घर. मंगा, तुझ्या हृदयात मी माझे घरटे बांधले आहे. सुंदर घरटे. मला तेथून नको हो हाकलू. नको हो दवडू. नको हो काठीने माझे घरटे पाडू. नीज, माझ्या मांडीवर नीज. डोळे मिटून नीज. मी एक गाणे म्हणते.’
मंगा डोळे मिटून पडला. मधुरी एक गाणे म्हणू लागली.
‘घरटे मी बांधियले, तुझिया हृदया रे मधे
तू येथे राहू नको, ऐसे सखया न वदे ॥ घरटे०॥
घिरटया जगि घालुनिया
दमले जगि बहु राया
राहुन हृदयकुंजि तुझ्या करिते मी मुदे॥ घरटे०॥
पाखरु हे थकलेले
पाखरु हे दमलेले
व्याकुळले भूकभरे, प्रेमफळे मधु मज दे॥ घरटे०॥
हाकलती मज सगळे
जाऊ कुठे मज न कळे
एक तुझी मज आशा, डोळे तव मूर्तिकडे॥ घरटे०॥
उडत इथे मी आले
आशेला मनि धरिले
जा येथुनि म्हणशि जरी, पडु दे तव चरणि मढे॥ घरटे०॥
मंगा ऐकत होता. मधुरीच्या डोळयांतील आसवांची फुले त्याच्या तोंडावर पडली. त्याने डोळे उघडले कोणी बोलत नव्हते. गाणे थांबले होते.
‘मधुरी, चल आपण जाऊ.’
‘कोठे जायचे?’
‘या उचंबळणा-या सागराच्या काठाकाठाने भटकू. आपले जीवन या समुद्रालाच समजेल. उचंबळणारी हृदये उचंबळणा-या समुद्राशिवाय कोणाला समजतील? चल, दे तुझा हात.