तीन मुले 19
मधुरी
मधुरी बाप मजूर होता. स्वत:ची झोपडी होती. मधुरीसुध्दा कधी कधी मजुरी करायला जात असे. आपल्या आईबापांना मदत करीत असे. आता कोठले खेळ, कोठले हिंडणे, फिरणे? तिच्या लहानपणाच्या मित्राची व तिची आता वरचेवर गाठ पडत नसे. तिची आई तिला कोठे दळायला पाठवी. कोठे भांडी घासायला पाठवी. मधुरीचा अल्लड स्वभाव. ती नेहमी आईचे ऐके असे नाही. कधी कधी तिला रागे भरे. मारीही.
एके दिवशी आईने मधुरीला भांडी घासावयास पाठविले. परंतु रस्त्यातून मिरवणूक जात होती. वाजंत्री वाजत होती. मधुरी मिरवणूक पहात उभी राहिली. भांडी घासायला मोलकरीण अजून आली नाही, म्हणून मधुरीच्या आईला बोलावायला पाठविले.
‘किती ग उशीर? भांडी कधी घासणार?’ मालकिणीने विचारले.
‘मधुरीला कधीच पाठविले होते. ती नाही का आली?’
‘नाही.’
‘कोठे गेली ही कार्टी?’
असे म्हणून मधुरीची आई भांडी घासायला बसली. ती भांडी घासू लागली. थोडया वेळाने मधुरी आली. आई संतापली होती.
‘कोठे ग होतीस? आता का यायचे भांडी घासायला? आणि त्यांनी दुसरी मोलकरीण लावली तर? खाल काय? येथे यायचे सोडून कोठे गेलीस हिंडत?’
असे बोलून आईने हातातील उलथने मधुरीला मारले; ती तिला मारु लागली. मधुरी ओरडू लागली. शेवटी मालकाच्या मंडळींनी शांत केले सारे.
मधुरी मुसमुसत होती. गरिबांना मिरवणूक पाहावयास स्वातंत्र्य नाही. त्या दिवसापासून ती कधी इकडे तिकडे रमली, गेली नाही. खेळकर हरणी, हिंडणार उडणारे पाखरु, परंतु आता ते जणू बंदिवान झाले होते.’
एके दिवशी मधुरीचा बाप घरी जखमी होऊन आला. बंदरावर काही तरी बोलाचाली होऊन मारामारी झाली. मंगाचा बाप व मधुरीचा बाप यांच्यात मारामारी झाली. शेवटी मंगानेच ती मारामारी सोडवली. मधुरीचा बाप तणतणत घरी आला होता. त्याचे कपडे फाटले होते, रक्त येत होते, कपाळाला पट्टी बांधलेली होती.