तीन मुले 81
‘पहाटेचे स्वप्न खरे होते.’
‘खरेच का?’
‘हा. काय पडले स्वप्न?’
‘छान छान स्वप्न. मंगा, खरेच गोड होते स्वप्न.’
‘काय पाहिलेस स्वप्नात?’
‘कोणाला पाहू?’
‘मी काय सांगू?’
‘पाहिले एकाला. त्याचे नाव आहे माहीत?’
‘म्हणजे मी ना?’
‘होय मंगा. तू परदेशातून घरी परत आला आहेस. सोन्या, रुपल्या तुझ्या भोवती नाचत आहेत. मनी तुझ्याकडे पाहात आहे. मी आनंदाने तुझ्याकडे पाहत आहे. तू मनीला बोलावतोस. ती येत नाही. किती गोड स्वप्न. तू माझा हात हातात घेतोस व दाबतोस. बोलत नाहीस. असे स्वप्न मी पाहिले.’
‘मधुरी, आता तुझी चिंता गेला ना! देवाने जणू दृष्टन्त दिला. मी सुखरुप येईन. काळजी नको. देव तारी त्याला कोण मारी? देव मारी त्याला कोण तारी? मधुरी, मानवाच्या हातात काय आहे?’
‘परंतु म्हणून जपू म्हणू नये काय? आपण काळजीत वागावे. शेवटी देवाची इच्छा. मंगा, स्वप्न गोड पडले खरे. परंतु कधी कधी स्वप्ने खोटी पडतात. खोटी ठरतात. नेमकी उलटी होतात.’
‘पहाटेचे तसे होत नाही. तू नीज जरा. गोड स्वप्नाच्या गुंगीत नीज.’
‘उठू दे मंगा आता. कोणी आले तर हसेल.’
‘सांगेन आजारी आहे मधुरी.’
‘मंगा, मला उठू दे.. .. ती.’
‘खोटे कशाला ते! उठू दे.’
मंगा तिला उठू देईना. ती रागावली, चिडली. शेवटी मधुरी उठली. ती उभी राहिली.
‘मधुरी, मी बाहेर जाऊन येतो. आपली झोपडी कोणी घेतो का पाहतो.’
‘खरेच का विकणार ही जागा?’
‘तू म्हणालीस ना विका म्हणून?’