तीन मुले 92
‘सीतेच्या केसांत घातलेली फुले कोमेजत नसत.’ मधुरी म्हणाली.
‘परंतु हे कोमेजेल.’ मंगा म्हणाला.
‘नाही कोमेजणार. मी डोळयांतील पाणी शिंपडूनते टवटवीत ठेवीन.
आणि आता वेळ होत आली. मंगा, मुले जवायला बसली.
‘मधुरी, तूही ये आता. मागून नको.’
‘बरे तर.’
आता बोलणे बंद पडले. डोळे भरून येत व बघत. पटकन् जेवणे झाली.
आणि झाली वेळ. सारी बंदरावर जाण्यास निघाली. मंगा क्षणभर घरात उभा राहिला. त्याने मधुरीला घट्ट धरले. कोणी सोडीना.
‘चल आता मधुरी.’
‘चला.’
अंगणात त्याने फुले पाहिली.
‘सोन्या, रुपल्या, फुले फुलवा हो, त्यांना पाणी घाला. सुकू देऊ नका या फुलझाडांना, मी आणखीन निरनिराळी फुलझाडे आणीन.’
‘निळी फुले आणा बाबा.’
‘नाहीतर पिवळी.’
हळूहळू बंदरावर ती आली. आजीबाईकडे गेली. आजीबाई वाटच पहात होती. मंगा पाया पडला. तिने अंगारा लाविला. जप हो, लौकर परत ये. ती म्हणाली आणि पुन्हा सर्व समुद्राकडे निघाली. गलबत पाण्यात दूर उभे होते. मंगा मधुरीचा हात धरून उभा होता.
‘चला, वेळ झाली.’ खलाशी म्हणाले.
‘मधुरी!’
‘मंगा, मंगा.’