तीन मुले 130
‘आम्ही लहान होतो. मी माझा एक मित्र व एक मुलगी. आम्ही तिघे होतो. आम्ही लटोपटीच्या लग्नाचा खेळ खेळत असू. आमची भांडणे लागत. मी म्हणे ती माझी नवरी होईल. तो म्हणे माझी होईल. शेवटी एकमेकांच्या छातीवर बसेपर्यंत पाळी येई. मग ती मुलगी आमची समजूत घाली. ती म्हणायची, रडू नका, भांडू नका. मी तुमची दोघांची छोटी बायको होईन. पुढे आम्ही मोठी झालो. तिला क दोघांची बायको होता आले असते? एकाजवळ तिने लग्न लावले.’
‘कोणाजवळ?’
‘माझ्याजवळ.’
‘तुमचा मित्र काय करतो?’
‘त्याचेही तिच्यावर प्रेम. तो अविवाहित राहिला. तो फकिरासारखा वागतो; परंतु त्याने आमच्या मार्गात अडथळे आणिले नाहीत; तो म्हणतो, मधुरीचा ज्यात आनंद तोच मी माझा मानला पाहिजे. असा तो माझा मित्र आहे. थोर मनाचा मित्र. तुम्हीही तसेच करा. प्रेमाची पराकाष्ठा करा. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला गुलाम करून मरून मुटकून गुलाम करण्यात काय स्वारस्य? प्रेमाने मोकळीक द्यावी. जाऊ द्या मला. मधुरीला केव्हा हृदयाशी धरीन असे मला झाले आहे. तुम्हांला तिच्या हृदयाची जाणीव का होत नाही?’
‘अणि माझ्याही हृदयाची कल्पना तुम्हांला का होत नाही? मला आज काय कमी आहे? सारी सुखे आहेत; परंतु मी आज संन्यासिनी झाले आहे, मला काय यातना होत असतील? मी का तुम्हांला स्वातंत्र्य देत नाही? तुम्हांला बळे नेले का माझ्या महालात? तुम्हांवर आणले का दडपण? तुमचा केला का छळ? मंगा, प्रेमाचा मत्सर फार दुष्ट असतो. मी तुमचा वधही करीन. प्रेमाची सुरी दुधारी असते. ती दोघांना मारील. मी तुम्हांला ठार करीन व स्वत:लाही करीन. मी काय करील मला माहीत नाही. प्रेम माणसाला चवताळविते. प्रेमाने मनुष्य हळुवार होतो व दगडाहूनही दगड होतो. मंगा, माझी कीव करा. आज मी जाते. माझे अश्रू रोज पाहून पाहून तुम्ही विरघळाल.’
‘मला काय येथे कोंडून मारणार? अरेरे! माझ्या सा-या आशा मेल्या. माझ्या मधुरीला सुखात ठेवण्याची माझी इच्छा. मुलाबाळांना सुखात ठेवण्याची इच्छा. ती टाहो फोडीत असतील. घरी खायला नसेल. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असतील बिचारी. आणि मी का येथे सुखोपभोगात रमू? उद्यापासून मी खाणेपिणे बंद करतो. अन्नव्रत घेतो. मधुरीचे स्मरण करीत येथे प्राण सोडतो.’
‘नको मंगा, असे करू नका. वाट पाहा.’
‘किती दिवस येथे वाट पाहू?’
‘काही दिवस जाऊ देत. मला आशा आहे की, तुमच्या हृदयात एक दिवस माझ्यासाठी प्रेम फुलेल. तुमच्या जीवनात ती घरटे बांधील; तुमच्या जीवनात, हृदयकुंजात कुहू करणारी मी कोकिळा बनेन. परंतु मंगा, ज्या दिवशी ही माझी आशा संपूर्णपणे मरेल त्या दिवशी मी तुम्हांला जाऊ देईन. मी तुम्हांला मुक्त करीन. मग माझे काहीही होवो. पाण्यावाचून मासा त्याप्रमाणे मी मग तडफडून मरेन.’
आणि ती राजकन्या गेली, मंगा तेथे रडत बसला. शून्य दृष्टीने पहात बसला. किती दिवस येथे पडून रहावे लागणार ते त्याला कळेना. त्याने ती गोधडी काढून आपल्या हृदयाशी धरिली, आणि पुन्हा ती हृदयाशी धरून तो तसाच झोपी गेला.