तीन मुले 135
‘मधुरी, तुला आनंद आहे ना? रुखरुख नाही ना?’
‘असे वाटते. त्यातून देव जाणे.’
‘माझी मधुरी आनंदी राहो. असे म्हणून बुधाने तिचा हात जवळ घेतला.’
बुधाने मधुरीचे एक मोठे चित्र रंगविले. ते दिवाणखान्यात मध्यभागी टांगले. त्याच्या हृदयाच्या दिवाणखान्यात तर ती कधीचीच होती. बुधा आता गाणे-बजावणे शिकू लागला. मुलेही शिकू लागली. सोन्याचा आवाज गोड होता. तो चांगला गाणारा होईल असे वाटू लागले.
आनंदात दिवस चालले होते आणि त्या आनंदात भर पडणार होती. मधुरीला नवीन बाळ होणार होते. बुधा हर्षला होता. त्याला
थोडी काळजीही वाटे. तो मधुरीला तिची इच्छा विचारी. ती हसे व म्हणे,
‘बुधा, तू वेडा आहेस.’
‘का? असे का म्हणतेस?’
‘अरे, पहिल्या बाळंतपणाला डोहाळे नि बिहाळे. नेहमी सुरु झाले की का कोणी विचारतो?’
‘परंतु माझ्या घरातले तुझे पहिलेच बाळंतपण. मधुरी, तुला नाही का यांचा आनंद होत? खरे सांग.’
‘होतो हो, बुधा.’
‘मग सांग तुझी इच्छा.’
‘माझ्या इच्छा तूच ओळख व पु-या कर.’
‘मला कसे काय कळणार तुझ्या मनातील?’
‘प्रेमाला सारे कळते. प्रेम सर्वज्ञ असते.’
‘मधुरी, उद्या पौर्णिमा आहे.’
‘मग?’
‘आपण नावेत बसून फिरायला जाऊ, येशील?’
‘माझ्या मनातलेच बोललास तू.’
आणि दुस-या दिवशी रात्री मधुरी व बुधा बाहेर पडली. मुले झोपली होती. एक सुंदर नाव सजविण्यात आली. तीत सुंदर गादी घालण्यात आली. मधुरी हळूहळू चालत होती. समुद्रकाठी दोघे आली.