तीन मुले 102
‘आजी, एखाद्या भुताचाच त्रास आम्हांला आहे का ग! ते भूत बुधाला समुद्राकडे बोट करून दाखवी. त्याचा काय अर्थ! सोन्या आजारी पडला. माझे बाळंतपण तशा प्रकारचे झाले. काही तरी तोच प्रकार असेल!’
‘कसले भूत नि काय? मला ७५ वर्षे झाली, मी कधी भूत
पाहिले नाही. मनातल्या कल्पना. उगाच काही तरी मनात घेतलेस.’
‘आजी!’
‘काय!’
‘सारे चांगले होईल ना! म्हण सारे चांगले होईल. तुझ्या शब्दांमुळे धीर येतो. तुझी वाणी म्हणजे देववाणी. सांग आजी, तुझ्या डोळयांना काय दिसते! बघे, त्या समुद्राकडे बघ. दिसते का मंगाचे गलबत? दिसते का त्याची मूर्ती? सांग. तुझ्या डोळयांना खरे तेच दिसेल. तू खरी भविष्य पाहणारी. पंचांग पहाण्यापेक्षा पवित्र व शुध्द माणसांचे मन सांगेल तेच खरे. सांग ना आजी. तुझे पाय धरावे असे वाटते.’
‘वेडी पोर, काही तरी विचारतेस.’
‘सांग ना पण.’
‘येईल हो मंगा, सारे छान होईल. पूस डोळे. रडत रडत नको जाऊस. पोरांना खेळव, हसव, वाढव. मुलांच्या देखत रडणे पाप आहे. मुलांच्या सभोवती आनंद पसरून ठेवावा. त्यांचे वाढते वय. या वेळेस शरीर वाढत असते. मन वाढत असते. या वेळेस आघात होता कामा नये. हसत जा. सारे भले होईल.’
‘हसेन आजी. मी हसेन. मंगा लहानपणी मला रडूबाई म्हणे.’
‘आता आल्यावर हसूबाई म्हणू दे. हसरी मधुरी हो.’