तीन मुले 79
नाही मागत कशी? शेजारी मागायला गेली म्हणून तर तू डागलेस त्यांना.’
‘का पुन: पुन्हा ती आठवण मला करुन देतोस?’
‘मधुरी, बोल का रडतेस? बोल.’
‘तुला माहीत आहे.’
‘तू आजपासून रडू नकोस. मंगाला बरे वाटावे अशी इच्छा असेल तर रडू नकोस. मधुरी, तू आता पुन्हा रडताना दिसलीस तर मी तुजजवळ बोलणार नाही. कबूल कर.’
‘बोलू नकोस. परंतु डोळयांसमोर तर दिसशील ना? मंगा, तू माझ्या जवळ असलास म्हणजे पुरे. तुझा श्वासोच्छ्वासही मजजवळ बोलतो. तू कोठे जाऊही नकोस म्हणजे झाले.’
‘मधुरी, मी का तुझ्या मनात नेहमी नाही?’
‘मंगा, त्याने नसते हो समाधान.’
‘खरोखरच एखादे वेळेस मला तुझा फार राग येतो. बायका म्हणजे घोरपडी. चिकटून बसतात, गुदमरवतात. तुम्ही पुरुषांच्या पायातील बेडया. त्यांच्या मार्गातील दगड.’
‘मंगा आजपासून नाही हो तुझ्या मार्गात अडथळा करणार. नाही घोरपड होणार. नाही पायातील बेडी होणार. जा मंगा, कोठेही अस. सुखरुप अस म्हणजे झाले. मी तुझी आठवण काढून सुख मानीन.’
‘मधुरी!’
‘काय?’
‘तू त्राग्याने सांगतेस, होय ना? आटापिटा करुन सांगत आहेस, होय ना?’
‘नाही हो. मी शांतपणे सांगत आहे.’
‘शांतपणे?’
‘हो. एका क्षणात ग कशी शांती आली?’
‘अती झाले म्हणजे मनुष्य निराळा होतो मंगा.’
‘मग मी जाऊ?’
‘हं.’