तीन मुले 39
दोघे उठली. समुद्राच्या काठाने दोघे फिरत निघाली. मध्येच पाण्यातून जात. लाटा त्यांच्या पायावर नाचत. हातात हात नाचत. अंगावर रोमांच नाचत. एके ठिकाणी बरेच दगड होते. दगडावर खारे पाणी आदळून आपटून दगडाची जणू शस्त्रे झाली होती. प्रेमाला कशाची भीती? प्रेमाने पाषाणाची फुले होतात, तलवारीचे हार होतात; काटयाचे मुकुट होतात, मरणाचे जीवन होते. प्रेम म्हणजे मंत्र, प्रेम म्हणजे जादू, प्रेम म्हणजे किमया. मधुरी व मंगा त्या दगडांवरुन नाचत गेली. परंतु मधुरीचा पाय कातळाने कापला होता. त्यातून रक्त येत होते. एकाएकी मंगाचे लक्ष तिकडे गेले.
‘मधुरी, काय ग लागले?’
‘कुठे?’
‘ते बघ रक्त. थांब.’
दोघे तेथे वाळूत बसली. मंगाने धोतराची धांदोटी फाडून पट्टी बांधली. रक्त थांबेना. ते येतच होते.
‘भरतीची वेळ आहे.’ मंगा म्हणाला.
‘होय. लाटा पाहा उसळत आहेत.’ मधुरी म्हणाली.
‘समुद्राला भरती आणि आपल्या हृदयांना भरती.’
‘परंतु हृदयाला कधी आहोट नको हो.’
‘आपले प्रेम नेहमीच नाचो, उचंबळो, वाढो!’
‘मंगा!’
‘काय?’
‘या समुद्राची नेहमी मला भीती वाटते. आज माझा पाय कापला.’
‘मला कधीही समुद्राची भीती वाटत नाही.’
‘मंगा, आपण तेथे बसू चल. ती पाहा दगडातील नैसर्गिक खोली.’
‘दगडाचे मंदिर.’
‘त्यातीन आपण देव.’
‘दोघे तेथे जाऊन बसली. कोणी बोलत नव्हते.’ थोडया वेळाने मंगा म्हणाला,
‘मधुरी, दमली आहेस. माझ्या मांडीवर नीज.’
‘गाणे म्हणशील?’
‘मला गाणे नाही म्हणता येत.’
बुधा गाणे म्हणतो.