तीन मुले 141
‘लोट. म्हणजे मी लौकर शांत होईन. मधुरीशिवाय जगणे मला असह्य होत आहे. मला विषाचा पेला दे. फाशी लटकव. हालहाल करून मार. मी तुझा आभारी होईन.’
‘मंगा, मी असे करीन?’
‘सारे करशील. प्रेम उलटले तर ते विषाहून मारक होते. श्रध्दा मेली तर मनुष्य अधिक क्रूर होतो. तूच मला बंगल्यात देव म्हणून पूजिलेस. तूच मला आज या अंधारकोठडीत ठेवले आहेस. उद्या मारशीलही. सारे शक्य आहे.’
‘नाही. मंगा, मी इतकी नीच नाही.’
‘तर मग माझी गोधडी मला आणून दे.’
‘माझ्या प्रेमापेक्षा ती चिंधी तुला प्रिय आहे ना?’
‘हो.’
‘उद्या ती गोधडी आणून येथे तुझ्यासमोर जाळून टाकते.’
‘तिच्याबरोबर मलाही जाळ. माझ्या अंगाभोवती ती गुंडळ व दे काडी लावून. माझ्या जीवनाचे सोने हाईल.’
राजकन्या गेली. मंगा विचार करीत बसला. मधुरी, मधुरी असा तो जप करी. त्याच्या खोलीत एक उंदीर येई. मंगा त्याला भाकर देई. तो उंदीर त्याला मित्र वाटे. तो त्याचा तेथला सोबती झाला तो उंदीर आपल्य चंचला डोळयांनी त्याच्याकडे बघे. जणू त्याचे सुखदु:ख विचारी. कुरतडून टाकू का तुझे दु:ख, असे जणू विचारी.
एके दिवशी राजकन्या आली. ती गोधडी घेऊन आली. मंगाला तिने बाहेर काढले. शिपाई उभे होते.
‘मंगा, तेथे उभा राहा.’ ती म्हणाली.
‘उभा राहून कय करू?’ त्याने विचारले.
‘मधुरीने दिलेल्या गोधडीची होळी बघ.’ ती हसत म्हणाली.
तिने ती गोधडी बरोबर आणली होती. शिपायांनी होळी पेटविली. राजकन्या आता ती गोधडी त्या होळीत टाकणार इतक्यात मंगाने वाघासारखी झडप घातली व ती गोधडी त्याने काढून घेतली. शिपायांनी त्याला खसकन् ओढले.
‘धरू नका त्याला.’ ती म्हणाली.
शिपायांनी त्याला सोडले.
‘तुम्ही निघून जा.’ ती शिपायांस म्हणाली.
शिपाई गेले. तेथे मंगा व राजकन्या दोघे उभी होती.