तीन मुले 111
‘बरे हो. नेसशील ना लुगडे?’
‘नेसेन.’
‘आणि हे मुलांना कपडे. तुला आवडले का?’
‘बुधा, इतके उंची कपडे कशाला?’
‘मंगा परत आला तर त्याने अशीच उंची वस्त्रे आणिली असती. खरं की नाही! तुला आवडली ना?’
‘कोणाला आवडणार नाहीत?’
‘मधुरी, दिवाळीला दिवे लाव.
‘कोणासाठी लावू!’
‘मुलांसाठी लाव. मुलांना शोकाची कल्पना नको देऊ. त्यांना आनंदात ठेव. आनंदात दिवाळी होऊ दे. आपली रडगाणी त्यांच्या पुढे कशाला? त्या पाखरांना नाचू दे; खाऊ दे गोड गोड. घालू दे नवीन कपडे. मजा करू दे. लावशील ना दिवे?’
‘मनात दिवा नसेल तर बाहेर काय कामाचा?’
‘मनातही दिवा लाव. हृदयातही दिवा लाव.’
‘कसा लावणार? तेथे प्रेमाचा दिवा आता कोण लावील? माझा मंगा होता तो काय करायचा सांगू! माझ्या छातीत बोटे खुपशी. नखे खुपशी व म्हणे तुझ्या आत जाऊन राहू दे. तुझ्या हृदयात जाऊन बसू दे. असा तो होता. माझ्या हृदयात नंदादीप लावणारा तो मंगा. आता कोठला दिवा, कोठली प्रकाशाची प्रेमळ हवा?’
‘लहानसा प्रेमाचा दिवा तुझ्या हृदयात मी नाही का लावला? आजपर्यंत मोठया दिव्याच्या प्रकाशात त्याचा उजेड दिसला नाही. चंद्र फुलला असता इतर ता-यांचे तेज दिसत नाही. परंतु अमावस्येच्या दिवशी त्या ता-यांची मौज दिसते. मधुरी, तू आपल्या हृदयमंदिरात बघ. तेथे मीही एक दिवा लावलेला आहे असे तुला दिसेल. तो तेवत असेल. तुझ्या हृदयगाभा-यात अगदीच अंधार नाही.’
‘बुधा!’
‘काय मधुरी? येत जा हो मधून मधून.’
‘दिवाळीला काय आणू?’
‘बुधा, तू रे दिवाळी कोठे करतोस?’
‘आज दहा वर्षांत बुधाने दिवाळी केली नाही.’
‘दहा वर्षांत?’
‘हो.’
आणि तुला मी बोलावले नाही. आज दहा वर्षे तुला सणवार नाही. बुधा, या दिवाळीला तू माझ्याकडे ये. मंगा नाही. त्याची आठवण तू भरून काढ. मंगाची जखम तू भरून काढ. येशील माझ्याकडे दिवाळीच्या दिवसांत? जेव, माझ्याकडे फराळ कर; तुझे पान मांडीन, रांगोळी घालीन. मंगाला नीट नाही हो रांगोळी काढता यावयाची. मग रागवायचा.’