तीन मुले 57
‘मधुरी झोपली. मंगा बसला होता. सोन्याला आता बोलवतही नव्हते. त्याने नुसती खूण केली. बापाने सूप खाली दिले. मंगाने ओल्या फडक्याने त्याचे ढुंगण पुसले. जरा जोराने पुसते.’
‘जोराने नको हो बाबा. दुखते हो.’
‘बरे हो बाळ. नाही जोराने पुसणार. उगी उगी.’
‘खरेच, संसार म्हणजे शाळा आहे. तपश्चर्येचा आश्रम. संयमाचा आश्रम. मंगा, मधुरी यांचे विकारांचे वेग तेथे कमी होत होते. संसारात किती सहनशीलता अंगी येते! दुस-यासाठी आपण किती धडपडतो! कसे स्वत:ला आवरतो! जगात नीट वागण्यासाठी प्रथम घरच्या शाळेतच आपण तयार होतो. आपण घरी माणसाळतो व मग या जगात जरा माणुसकीने वागतो. घर म्हणजे माकडांना माणसे बनविणारी शाळा.’
सोन्या बरा झाला. त्या दुखण्यातून तो वाचला. पहिला सोन्या. दुस-या मुलाचे नाव रुपल्या आणि तिसरी आता मुलगी झाली; तिचे नाव मनी. एके दिवशी मंगा म्हातारीकडे गेला होता.
‘मंगा, घरी तुम्हांला अडचण पडत असेल, नाही?
‘आजी, चाललेच आहे. मरेपर्यंत गरिबांना विसावा नाही.’
‘मंगा, मी तुला एक विचारु?’
‘विचार आजी.’
‘किती दिवस मनात येतो आहे विचार. सांगेन सांगेन म्हणते, परंतु धीर तर होत नाही. तू रागावणार नाहीस ना?’ ‘आजी, तुझे आमच्यावर प्रेम. तुझे आमच्यावर किती उपकार! सांग.’
‘तुझा सोन्या मला दे. त्याला मी माझा मानीन.’
‘आजी, आईबापांना का मुलांचे ओझे असते?’
‘नसते हो.’
‘आजी, मधुरी काय म्हणेल? आम्ही उपाशी राहू; परंतु बाळाला वाढवू.’
‘मंगा, एक मूल द्यायला का रे अडचण? किती दिवस मी मनात म्हणत होते की. सोन्याचं बाळंतपण मी केलं, एक दिवस मी सोन्या मागेन.’
‘यासाठी का बाळंतपण केलंस?’
‘नाही रे. परंतु आता तीन मुले आहेत तुम्हांला. म्हटले मागावे एक. कोणते मागावे? सोन्याच मागावा. मी त्याला कमी पडू देणार नाही. माझ्याजवळ आहे नाही ते त्याला देईन.’
‘आजी, किती ग पैसे तू जमविले आहेस?’
‘आहेत सोन्याच्या संसारास पुरेसे.’ ‘आमच्या घरी येतेस तू रहायला? तू आमची आई हो. मुलांची आजी हो. मुलांचे कोडकौतुक कर.’